देशात अनेक राज्यांमध्ये वाघांपाठोपाठ बिबट्यांची संख्या वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकट्या उत्तराखंड राज्यात तब्बल ३,११५ बिबट्यांची नोंद करण्यात आली आहे. वन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. २०१५ पासून उत्तराखंडमध्ये बिबट्यांची संख्या वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. २०१५ च्या अखेरच्या महिन्यात करण्यात आलेल्या गणनेनुसार उत्तराखंडमध्ये २,३३५ बिबटे होते. यात गेल्या ८ वर्षांमध्ये २९ टक्के वाढ झाली आहे. खरंतर ही आकडेवारी गंभीर आहे, कारण, या राज्यात गेल्या काही वर्षांपासून मानव-बिबट्या संघर्ष पाहायला मिळतोय.
जानेवारी २०२० ते जून २०२३ या कालावधीत उत्तराखंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकूण ५०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १,८०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अशी माहिती वनविभागाने दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला जून २००१ पासून आतापर्यंत १,६५८ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी बरेचसे मृत्यू हे अपघात, आपसातली भांडणं आणि इतर कारणांमुळे झाले आहेत.
उत्तराखंडचे मुख्य वन्यजीव वॉर्डन समीर सिन्हा यांनी राज्यातल्या मानव-बिबट्या संघर्षाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, बिबट्यांची वाढलेली संख्या ही आम्हाला आगामी समस्यांचा अंदाज घेण्यास मदत करेल आणि आम्ही हा संघर्ष कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करू. ते न्युज १८ शी बोलत होते. बिबट्यांची मोजणी करण्यासाठी वनविभागाने ट्रॅप कॅमेऱ्यांची मदत घेतली तसेच प्रत्यक्ष पाहणी देखील केली आहे.
हे ही वाचा >> माफी मागत जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही बंद; कारण काय? वाचा…
मानव-बिबट्या संघर्षाबद्दल तज्ज्ञांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. तज्ज्ञांचा एक गट असं मानतो की, मानवी वस्ती वाढू लागली आहे. आपण वनक्षेत्र कमी करत आहोत त्यामुळे हा संघर्ष होतोय. तर दुसऱ्या गटाला असं वाटतं की, अन्नासाठी बिबटे मानवी वस्तीकडे येत आहेत. बिबट्यांवर सखोल अभ्यास करणारे आणि राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य अनुप साह म्हणाले की, मानव-बिबट्या संघर्षाला वाढतं शहरीकरण जबाबदार आहे. एका बाजूला मानवी जीव वाचवणं आणि दुसऱ्या बाजूला बिबट्या आणि वाघांनाही वाचवायचं आहे. त्यामुळे वन विभागासमोरची आव्हानं वाढली आहेत.