नासाच्या संशोधकांना गुरूच्या युरोपा नावाच्या चंद्रावर (नैसर्गिक उपग्रह) हायड्रोजन पेरॉक्साईड हे जीवसृष्टीस अनुकूल असे रसायन सापडले आहे. ते तेथे मुबलक प्रमाणात आहे. संशोधकांच्या मते युरोपाच्या पृष्ठभागावरील पेरॉक्साईड जर तेथील महासागरात मिसळले तर तो सूक्ष्म जीवांसाठी एक ऊर्जास्रोत ठरू शकतो. त्यामुळे तेथे सूक्ष्म जीवांना पोषक स्थिती निर्माण होऊ शकते. सजीवसृष्टीसाठी पाणी, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस व सल्फर असे अनेक घटक आवश्यक असतात, असे नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचे केव्हीन हँड यांनी सांगितले. युरोपावर द्रवरूपात पाणी आहे व पेरॉक्साईडसारखी संयुगेही आहेत. पृथ्वीवर बहुपेशीय पेशींच्या सजीवांसाठी पेरॉक्साईड आवश्यक असते, असे नासाचे हँड यांनी स्पष्ट केले.
अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून हँड व पॅसाडेनातील कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे माइक ब्राऊन यांनी युरोपावरील अवरक्त प्रकाशाचा अभ्यास करून केक-२ या दुर्बिणीच्या मदतीने हे निष्कर्ष काढले आहेत. नासाच्या गॅलिलिओ मोहिमेत पहिल्यांदा युरोपावर हायड्रोजन पेरॉक्साईड असल्याचे सिद्ध झाले होते. १९९५ ते २००३ दरम्यान गॅलिलिओने या उपग्रहाचा वेध घेतला होता. नवीन अभ्यासानुसार पेरॉक्साईड हे युरोपाच्या पृष्ठभागावर सर्वत्र पसरलेले आहे. युरोपावरील बर्फ हा पाण्याच्या रूपात आला आहे. तेथे काहीसे सल्फरचेही मिश्रण आहे. पेरॉक्साईड हे युरोपाच्या बर्फावर पडणाऱ्या प्रारणांमुळे बनते. या उपग्रहाचा काही भाग हा गुरूच्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली येतो तेथे ही प्रारणे युरोपाच्या पृष्ठभागावरील बर्फावर आदळतात.
ब्राऊन यांनी सांगितले, की गॅलिलिओने युरोपावर पेरॉक्साईड असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते व आता केक दुर्बिणीच्या निरीक्षणांनी त्याचे प्रमाणही जवळपास कळले आहे. द्रव महासागरांसाठी हायड्रोजन पेरॉक्साईड हा आवश्यक घटक असतो. युरोपावरील हायड्रोजन पेरॉक्साईड तेथील महासागरात मिसळला तर जीवसृष्टीस अनुकूल स्थिती तयार होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life seeding compound abundant on jupiters moon europa