आकाशगंगेच्या प्रभामंडळात असलेली बटू उपदीर्घिका सापडली असून ती सर्वात फिकट आहे. त्यातून दीर्घिकांची निर्मिती व कृष्णद्रव्याचे अवकाशातील विखुरणे याबाबत नवीन माहिती मिळणार आहे. या बटू उपदीर्घिकेचे नाव व्हिरगो १ असून ती कन्या तारकासमूहात आहे. जपानच्या टोहोकू विद्यापीठाच्या संशोधकांनी ही दीर्घिका शोधली असून आकाशगंगेच्या प्रभामंडळात अशा अनेक फिकट उपदीर्घिका असू शकतात असे त्यांचे मत आहे. सध्या अशा ५० उपदीर्घिका शोधण्यात आलेल्या असून त्यातील ४० फिकट व ड्वार्फ स्फेरॉइडल गॅलेक्सिज प्रकारातील आहेत. त्यातील अनेक दीर्घिका अलीकडे शोधल्या असून त्यांची प्रकाशमानता उणे ८ आहे. यापूर्वी २.५ ते ४ मीटर व्यासाच्या दुर्बिणीतून दीर्घिका शोधण्यात आल्या आहेत, त्यामुळे जास्त प्रकाशमान दीर्घिका शोधल्या गेल्या आहेत. दूरच्या व कमी प्रकाशमान दीर्घिका यात शोधण्यात आल्या नव्हत्या. आता ८.२ मीटर सुबारू दुर्बीण व हायपर सुप्राइम कॅम उपकरणाने शोध घेतला असता फिकट व बटू दीर्घिका सापडत आहेत. या दोन्ही उपकरणांची माहिती तपासून पाहिली असता कन्या तारकासमूहात जास्त घनतेचे तारे दिसले होते, ते प्राचीन तारका प्रणालीचे निदर्शक आहेत, असे टोहोकू विद्यापीठाचे डायसुक होमा यांनी सांगितले. आता शोधण्यात आलेली दीर्घिका ही फिकट असून तिची प्रकाशमानता उणे ०.८ आहे. होमा यांना व्हिर्गो १ दीर्घिका मसाशी छिबा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण करताना सापडली आहे. तिची त्रिज्या १२४ प्रकाशवर्षे आहे. यापूर्वी सेग्यू १ ही फिकट म्हणजे कमी प्रकाशमान दीर्घिका स्लोन डिजिटल स्काय सव्र्हेत, तर सेटस २ दीर्घिका डार्क एनर्जी सव्र्हेत सापडली होती. सेटस २ या दीर्घिकेच्या शोधावर अजून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. व्हिर्गो १ ही आतापर्यंत शोधलेली सर्वात फिकट दीर्घिका असून ती सूर्यापासून २ लाख ८० हजार प्रकाशवर्षे दूर आहे. आकाशगंगेच्या प्रभामंडळात अनेक फिकट दीर्घिका असू शकतात, असे छिबा यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2016 रोजी प्रकाशित
आकाशगंगेच्या प्रभामंडळात फिकट दीर्घिकेचा शोध
आकाशगंगेच्या प्रभामंडळात असलेली बटू उपदीर्घिका सापडली असून ती सर्वात फिकट आहे.

First published on: 24-11-2016 at 01:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Light galaxy search in galaxy