Lord Ram : प्रसिद्ध तमिळ गीतकार आणि कवी वैरामुत्तू यांच्या एका वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कवी वैरामुत्तू यांना प्राचीन कवी कंबर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार देण्यात आला. कवी कंबर यांनी रामायणावर लेख लिहिले होते, काव्यं रचली होती. कंब रामायणम या नावाने रामायणावर आधारित महाकाव्य लिहिलं आहे. कवी कंबर यांनी लिहिलेल्या या महाकाव्याला इरामावतारम असंही नाव आहे. बालकांड ते युद्धकांड अशा सहा कांडांचा या महाकाव्यात समावेश असून त्यात ४ हजार श्लोक आहेत. कंब रामायण हे वाल्मिकी रामायणावर बेतलेलं आहे.
कवी वैरामुत्तू यांनी केलेलं विधान नेमकं काय?
कवी वैरामुत्तू पुरस्कार सोहळ्यात म्हणाले, “जेव्हा सीतेचं अपहरण रावणाने केलं त्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन ढळलं होतं. प्रभू राम आणि सीता हे दोघं वेगळे झाले तेव्हा आपण काय करत आहोत, कसे वागत आहोत याचं भान त्यांना उरलं नाही. त्या काळात रामाच्या हातून काही गुन्हेही घडले. मात्र कवी कंबर यांनी रामाच्या सगळ्या उण्या बाजू लपवण्याचं काम केलं. कंबर यांनी रामाची प्रतिमा क्षमाशील, दयाशील, देव अशा प्रकारे रंगवण्यात आली. त्यांच्या उण्या बाजू झाकण्यात आल्या.” असं वैरामुत्तू यांनी म्हटलं आहे.
निंदा आणि लोकप्रियता या गोष्टी कुणाच्याही आयुष्यात असतातच
जेव्हा एखाद्या व्यक्तीला अपार प्रसिद्धी मिळते तेव्हा त्याच्या आयुष्यात बदनामीचा काळही येतोच. निंदा आणि लोकप्रियता अशा दोन्ही गोष्टी त्या व्यक्तीच्या आयुष्यात असतात. भगवान रामाचं आयुष्यही असंच होतं. मात्र कंबर हे असे कवी आहेत ज्यांनी भगवान रामाच्या उण्या बाजू झाकल्या. रामाच्या चरित्रातून त्यांनी बदनामी वगळली. रामाने लपून वालीवर बाण चालवला. त्यामुळे त्यांची बदनामी झाली होती. मात्र हा कलंक मिटवण्याचं काम कंबर यांनी केलं.
वैरामुत्तू यांनी कंबर यांच्या महाकाव्यातील संवादांचं दिलं उदाहरण
वैरामुत्तू यांनी कंबर यांच्या महाकाव्यातील वालीच्या संवादाचा हवाला देत सांगितलं की रामाने जर आपल्या भावासाठी आपल्या राज्याचा त्याग केला होता तर मग माझं शासन त्याने माझ्या भावाला का दिलं? रामाने जे केलं त्यात त्याचा दोष नाही कारण सीतेचं अपहरण झाल्यानंतर रामाचं मानसिक संतुलन ढळलं होतं. त्यामुळे या गोष्टींसाठी रामाला माफ करता येईल. रामाने जे केलं ते भारतीय दंड संहितेनुसार गुन्हेगारी कृत्य होतं असंही वैरामुत्तू म्हणाले. पुढे ते म्हणाले की कवी कंबर यांनी रामाची तुलना सूर्याशी नाही तर चंद्राशी केली होती. कारण सूर्यावर डाग नसतो पण चंद्रावर डाग असतात. त्यामुळेच कवी कंबर यांनी हे केलं होतं. वाल्मिकी रामायणात राम कसा वागला याचं यथार्थ वर्णन आहे. मात्र कवी कंबर यांनी रामाची बदनामी वगळून टाकली आणि त्याला देवत्व दिलं. वैरामुत्तू यांच्या या वक्तव्यानंतर आता वादाला तोंड फुटलं आहे.
भाजपाने काय म्हटलं आहे?
गीतकार आणि कवी वैरामुत्तू यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता वाद सुरु झाला आहे. भाजपाचे प्रवक्ते सीआर केशवन म्हणाले, “वैरामुत्तू यांनी हिंदू देव-देवतांचा अपमान केला आहे. या प्रकरणात ते अपराधी आहेत. भगवान राम आणि हिंदू धर्मातील कोट्यवधी भक्तांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. वैरामुत्तू दुसऱ्या धर्मातील देवांच्या विरोधात ईशनिंदेचं धाडस करु शकतात का? ” असाही सवाल केशवन यांनी विचारला आहे.