Louvre Museum Heist: फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ऐतिहासिक लूव्र संग्रहालयातील नऊ ऐतिहासिक दागिन्यांची आज चोरी झाली आहे. फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट नुनेझ यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, चोर बास्केट लिफ्ट वापरून संग्रहालयात घुसले आणि त्यांनी अवघ्या “सात मिनिटांत” ही अमूल्य दागिने चोरली, त्यानंतर मोटारसायकलवरून पळून गेले. चोरीला गेलेल्या दागिन्यांपैकी नेपोलियन आणि महाराणी संग्रहातील एक दागिना नंतर संग्रहालयाबाहेर सापडला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. चोरांनी लूव्र संग्रहालयातील नेपोलियन आणि एम्प्रेस संग्रहातील नऊ दागिन्यांची चोरी केली आहे.
गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “या चोरीचा तपास सुरू करण्यात आला असून चोरीला गेलेल्या दागिन्यांची सविस्तर यादी तयार केली जात आहे. बाजारभावापेक्षा या दागिन्यांना अमूल्य वारसा आणि ऐतिहासिक मूल्य आहे.”
फ्रेंच वृत्तपत्र ‘ले पॅरिसियन’च्या मते, दरोडेखोरांनी सीन नदीच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामाधीन भागातून संग्रहालयात प्रवेश केला. त्यांनी अपोलो गॅलरी रूममध्ये पोहोचण्यासाठी मालवाहू लिफ्टचा वापर केला. वृत्तात असेही म्हटले आहे की, खोलीत प्रवेश करण्यासाठी त्यांनी खिडक्या तोडल्या आणि नेपोलियन व एम्प्रेसच्या संग्रहातील नऊ दागिने चोरले.
दरम्यान, लूव्र संग्रहालयाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवर जाहीर केले की, आज संग्रहालय काही असामान्य कारणांमुळे बंद राहणार आहे. संग्रहालय उघडताच अधिकाऱ्यांना दरोड्याची माहिती मिळाली, असेही वृत्त आहे. रविवार असल्याने तेथे मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते.
लूव्र हे फ्रान्सचे राष्ट्रीय संग्रहालय आहे, जे १२व्या शतकातील फिलिप ऑगस्टसच्या किल्ल्याच्या एका भागात आहे. हे जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे कला संग्रहालय आहे, ज्यामध्ये प्राचीन संस्कृतींपासून ते १९व्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या लाखो कलाकृती संग्रहित आहेत. जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दा विंची यांचे ‘मोना लिसा’ हे चित्रही याच संग्रहालयात आहे. संग्रहालयातील कलाकृतींची किंमत अब्जावधी रुपयांमध्ये आहे.