मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यानंतर आता लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे. २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने दिलेल्या आदेशात एक महत्त्वाचा आणि महत्त्वाचा खुलासा झाला. न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणात आरोपी असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्या निवासस्थान ए-९ मध्ये कोणतेही आरडीएक्स, स्फोटक पदार्थ किंवा संशयास्पद बॉम्ब बनवण्याच्या वस्तू सापडल्या नाहीत. आता यानंतर प्रसाद पुरोहित यांना कर्नल या पदावर बढती देण्यात आली आहे.
प्रसाद पुरोहित ९ वर्षे तुरुंगात होते
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले होते. प्रसाद पुरोहित यांनी या स्फोट प्रकरणात नऊ वर्षे तुरुंगवास भोगला आहे. पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला की त्यांना राजकीयदृष्ट्या अडकवण्यात आलं. प्रसाद पुरोहित हे १९९४ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सामील झाले होते. काही दिवसांपूर्वी, मालेगाव स्फोट प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयानंतर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या गेल्या १६ वर्षांपासूनच्या कारकिर्दीवर बंदी उठवण्यात आल्याचे उघड झाले. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी उठवण्याची फाइल आता दक्षिण कमांडकडे पाठवण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांची पदोन्नती आणि इतर सेवा हक्क पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
विशेष न्यायालयाने काय म्हटलं आहे?
एनआयच्या विशेष न्यायालयाने ३१ जुलै मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून प्रसाद पुरोहित यांची खटल्यातून निर्दोष सुटका केली. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब तयार करण्यासाठी आरडीएक्स मागवलं आणि त्यांच्या घरीच बॉम्ब तयार करण्यात आला होता असे आरोप झाले होते. मात्र या आरोपांबाबत कुठलेही पुरावे समोर आलेले नाहीत.न्यायालयाने म्हटलं आहे की, फिर्यादी पक्षाची कहाणी पूर्णपणे संशय आणि अनुमानांवर आधारित होती आणि त्याला समर्थन देण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय, कर्नल प्रसाद पुरोहित यांनी जम्मू आणि काश्मीरमधून आरडीएक्स आणले, ते त्यांच्या घरात लपवले आणि नंतर बॉम्ब बनवला हा गृहीतक केवळ अनुमानांवर आधारित होते. पुराव्याअभावी फिर्यादी पक्षाचा खटला निष्प्रभ झाला.
प्रसाद पुरोहित यांची १७ वर्षे कायदेशीर लढाई
१७ वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर प्रसाद पुरोहित यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर आता प्रसाद पुरोहित यांना कर्नल या पदावर बढती देण्यात आली आहे. पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. प्रसाद पुरोहित यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांचा सेवेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.