व्हिआयपींच्या म्हणजेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या 4 हजार फाईल्स पोलिसांच्या ताब्यात आल्या आहेत या फाईल कोणत्याही साध्यासुध्या फाईल्स नाहीत तर सेक्स स्कँडल संबंधित आहेत. मध्य प्रदेशात हे हनी ट्रॅप रॅकेट उघडकीस आलं आहे. देशातलं सर्वात मोठं ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल म्हणावं अशीच ही घटना आहे. या फाईल्समध्ये बड्या अधिकाऱ्यांचे सेक्स चॅट, न्यूड व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स यांचा समावेश आहे. या फाईल्स पोलिसांच्या हाती आल्याने अनेक नेते, अधिकारी आणि व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे.

मध्य प्रदेश हे देशातलं महत्त्वाचं राज्य मानलं जातं. मात्र याच राज्यात आता सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलचा खुलासा झाला आहे. या फाईल्समध्ये सेक्स चॅट, शरीरसंबंध प्रस्थापित करताना अधिकाऱ्यांचे व्हिडिओजचा समावेश तर आहेच. शिवाय काही बी ग्रेड सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रींचाही यात समावेश आहे. हनी ट्रॅप रॅकेट आणि सेक्स स्कँडल फक्त मध्य प्रदेशापुरतं नाही तर चार राज्यांमध्ये पसरलं आहे अशीही माहिती समोर येते आहे. उच्चपदस्थ अधिकारी, मध्य प्रदेशचे काही दिग्गज नेते या हनी ट्रॅपचे शिकार झाले आहेत असंही समजतं आहे.

दरम्यान सध्या मध्य प्रदेश पोलीस या प्रकरणात समोर आलेले व्हिडीओज, मेमरी कार्ड्स, फोटो यांची तपासणी करत आहेत. फॉरेन्सिक टीमला यासाठी जास्तीचे काम करावे लागते आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे. हनी ट्रॅप प्रकरणात जी काही माहिती समोर येते आहे त्यावरुन हा आकडा 5 हजारांच्या वर जाऊ शकतो. हनी ट्रॅप साठी काम करणाऱ्या मुली, महिला या भोपाळ येथील एका सुप्रसिद्ध क्लबमध्ये जात होत्या अशीही माहिती समोर येते आहे.

हनी ट्रॅपच्या जाळ्यात कसे अडकायचे अधिकारी किंवा नेते?

सोशल मीडियाचा वापर करुन उच्चपदस्थ अधिकारी, नेते यांना मुली, महिला जाळ्यात ओढत. तर कधी कधी सुंदर मुलींना या बड्या अधिकाऱ्यांच्या किंवा नेत्यांच्या घरी किंवा एखाद्या उंची हॉटेलमध्ये पाठवले जात असे. छुप्या कॅमेराच्या आधारे या मुली न्यूड व्हिडीओ शूट करत. त्यानंतर या सगळ्यांना ब्लॅकमेल करण्यात येई. इंदूर येथील नगरपालिकेच्या एका अभियंत्याने केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर हनी ट्रॅप चालवणाऱ्या पाच महिलांना भोपाळ आणि इंदूर या ठिकाणाहून अटक करण्यात आली.

इंदूर येथील अभियंत्याने हा आरोप केला होता की एक महिला त्याच्याशी मैत्री करुन नंतर त्याला ब्लॅकमेल करु पाहते आहे. या महिलेने काही रेकॉर्डिंगही केले. पोलिसांनी या प्रकरणाच्या निमित्ताने एका महिलेला ताब्यात घेतले त्यानंतर हळूहळू या सेक्स स्कँडलचा खुलासा झाला.