शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास क्वालालंपूरमध्ये भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका कॅम्पिंग साईटवर मोठी दरड कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये आत्तापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार २ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अजूनही ५० हून अधिक लोक दरडीच्या मलब्याखाली दबल्याची भीती प्रशासन आणि बचाव पथकांना आहे. त्यामुळे हा मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आलं.

नेमकं घडलं काय?

क्वालालंपूरच्या सेलंगोर परिसरामध्ये एका फार्महाऊसवर ही दरड कोसळली. या फार्महाऊसमध्ये पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली जाते. पहाटे तीनच्या सुमारास दुर्घटना घडली, तेव्हा फार्म हाऊसमध्ये सुमारे ८० लोक उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. त्यापैकी दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. २३ जणांना वाचवण्यात आलं आहे. मात्र, अजूनही ५०हून जास्त लोक बेपत्ता असून ते मलब्याखाली दबले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

३० मीटर उंचावरून कोसळली दरड!

दरम्यान, क्वालालंपूरमधील पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही दरड तब्बल ३० मीटर (अंदाजे १०० फूट) उंचीवरून कोसळली. त्यामुळे मलब्याखाली दबलेल्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जखमी असण्याची शक्यता आहे. बाहेर काढलेल्या लोकांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.