मलेशियन एअरलाइन्सचे बेपत्ता बोइंग विमान हिंदी महासागराच्या अतिदक्षिणेकडे कोसळल्याची अधिकृत घोषणा मलेशिया सरकारने केली असतानाच विमानाचा शोध जारी आहे. मात्र या विमानात अखेरच्या क्षणी नेमके काय घडले, त्याने अचानक आपला मार्ग का बदलला, त्याचे अपहरण झाले का, की वैमानिकांनीच आत्महत्या करण्यासाठी हा मार्ग पत्करला, आदी प्रश्नांची उत्तरे कदाचित कधीच मिळू शकणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्वालालम्पूर येथून बीजिंगच्या दिशेने झेपावलेले मलेशियन एअरलाइन्सचे विमान मलेशिया व व्हिएतनाम यांच्या हवाईसीमेवर असताना रडारवरून गायब झाले. तेव्हापासून या विमानाचा शोध जारी होता. अखेरीस हे बेपत्ता विमान हिंदी महासागराच्या अतिदक्षिणेकडील दुर्गम सागरी प्रदेशात कोसळून विमानातील सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याची अधिकृत घोषणा मलेशियन सरकारने सोमवारी केली. मात्र अजूनही या विमानाचे अवशेष सापडलेले नाहीत किंवा ते सागराच्या तळाशी असल्याचे पुरावे आढळलेले नाहीत.

चीनची मलेशियाकडे पुराव्यांची मागणी
मलेशियाचे बोइंग विमान दक्षिण हिंदी महासागरात कोसळल्याची घोषणा रात्री मलेशियाचे अध्यक्ष नजीब रझाक यांनी केली असली, तरी चीनचा अजूनही त्यावर विश्वास नसून त्याचे पुरावे द्यावेत अशी मागणी त्या देशाने केली आहे. या विमानाच्या दुर्घटनाग्रस्त होण्याचे पुरावे द्यावेत अशी अपेक्षा संतप्त नातेवाइकांनीही व्यक्त केली आहे. दरम्यान, चीनचे जे प्रवासी या विमानात होते त्यांच्याशी संबंधित ३०० निदर्शकांनी बीजिंग येथील मलेशियाच्या दूतावासासमोर निदर्शने करून आत घुसण्याचा प्रयत्न केला व पाण्याच्या बाटल्यांचा मारा केला. मलेशियाच्या राजदूतांना भेटू द्या, अशी त्यांची मागणी होती.
ब्रिटिश कंपनी इमनरसॅटच्या उपग्रहाने जी माहिती दिली आहे, त्याच्या आधारे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी मलेशियन एअरलाइन्सचे ‘एमएच ३७०’ हे विमान बेपत्ता झाल्याची घोषणा तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ८ मार्च रोजी हे विमान क्वालालंपूर येथून बीजिंगकडे जाण्यासाठी उडाल्यानंतर बेपत्ता झाले होते. नंतर दक्षिण हिंदी महासागरात फार दूरवर जाऊन पडल्याचे लक्षात आले. विमानाचे अपहरण झाले व त्यातील काही प्रवासी जिवंत असावेत किंवा ती जबरदस्तीने जमिनीवर उतरवण्यात आले असावे या शक्यतांना पूर्णविराम मिळाल्याने व आता आपले ते नातवाईक आपल्याला कधीही भेटणार नाहीत, या भावनने चिनी प्रवाशांच्या नातेवाइकांना जास्त भावनिक फटका बसला आहे.
मलेशियाने केलेल्या शोधकार्यावर चीनने टीका केली असून त्यांचे या विमानात १५३ प्रवासी होते. चीनचे उपपरराष्ट्रमंत्री झी हँगशेंग यांनी सांगितले, की ज्या उपग्रह माहितीच्या आधारे मलेशियाने ही घोषणा केली आहे, ती सगळी माहिती चीनला देण्यात यावी.
दरम्यान, अमेरिका त्यांचे ब्लॅक बॉक्स शोधण्याचे अत्याधुनिक यंत्र नौदल जहाजाच्या मदतीने संभाव्य ढिगारा असलेल्या प्रदेशात आणत आहे. कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर व फ्लाइट डाटा रेकॉर्डर या दोन्हींचा समावेश असलेला ब्लॅक बॉक्स सापडला तर या दुर्घटनेत शेवटी नेमके काय घडले असावे यावर प्रकाश पडू शकेल.

पिंगर लोकेटरचे प्रयत्न सुरूच

विमानाचे ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी अमेरिकेचे संरक्षण खाते ब्लॅक बॉक्स लोकेटर व रोबोटिक अंडरवॉटर व्हेइकल पाठवणार आहे. ऑस्ट्रेलियाची जहाजेही त्याचा शोध घेत आहेत. जहाजाला लावायचे पिंगर म्हणजे लोकेटर ब्लॅक बॉक्स शोधण्यास मदत करणार असून ब्लूफिन-२१ हे स्वयंचलित पाण्याखालून जाणाऱ्या वाहनाला ते जोडले जाणार आहे. त्यामुळे या विमानाच्या ढिगाऱ्याचा शोध घेण्यास मदत होणार आहे. ब्लूफिन २१ हे स्वयंचलित वाहन १४,७०० फूट खोलीवर काम करते व त्याची क्षमता २५ तासांत तीन नॉट मैल अंतर जाण्याची क्षमता असते. ते सागरांतर्गत काम करणारे निर्मनुष्य वाहन आहे. त्याच्या बाजूने सोनार यंत्रासारखे स्कॅनिंग करू शकते व ते अनेक लहरींचा वापर करणारे एको साउंडर म्हणजे प्रतिध्वनीवर काम करणारे यंत्र असते. एखादी वस्तू सागरात खोल गेली असेल तर त्याचा शोध घेण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो, असे ते म्हणाले. पिंगर लोकेटर हे उपकरण नौदलाने एअर फ्रान्सच्या विमान अपघातावेळी वापरले होते. किरबी यांच्या मते हे एक संवेदनशील श्रवणयंत्र असून ब्लॅक बॉक्समधून येणारे ध्वनी संदेश टिपू शकते.

ब्लॅक बॉक्स सापडला तरी विमानाने अचानक वळण का घेतले, हजारो किमी अंतर कापून ते हिंदी महासागराच्या दिशेने कसे गेले, त्यामागे कोण होते, वैमानिक व सहवैमानिकाची मन:स्थिती त्या वेळी कशी होती, याची उत्तरे मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे हवाई वाहतूक क्षेत्रातील या दुर्घटनेमागे नेमकी काय कारणे होती, याची उत्तरे सागराच्या तळाशीच लुप्त होण्याची भीती आहे.

ख्रिस येट्स, ब्रिटिश हवाई वाहतूकतज्ज्ञ

कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर विमान दुर्घटनाग्रस्त होण्याआधीच्या दोन तासांचाच डेटा साठवू शकतो, त्यामुळे विमान बेपत्ता होऊन ते हिंदी महासागरात कोसळेपर्यंत बराच वेळ गेला होता. म्हणून नेमके काय घडले, याचे उत्तर कदाचित कधीच मिळू शकणार नाही. विमान रडारवरून गायब का झाले, याचेही उत्तर मिळणे कठीण आहे.
लीहॅम कंपनी, अमेरिकास्थित हवाई क्षेत्राशी संबंधित सल्लागार कंपनी

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaysian plane mystery keeps unrevealed