Ahmedabad Plane Crash: अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरातील बीजे मेडिकल कॉलेज येथे विमान कोसळल्याची माहिती मिळताच आसपासच्या परिसरातील लोकांनी मदतकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक व्यावसायिक राजू पटेल (वय ५६) यांनी दुर्घटनेनंतर पाचच मिनिटांत आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. त्यांनी ७० तोळे सोने, रोकड जमा केली आणि सर्व मुद्देमाल यंत्रणेच्या ताब्यात दिला, अशी माहिती त्यांनी दिली. राजू पटेल यांनी केलेल्या कार्याचे आता सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना राजू पटेल म्हणाले की, आम्ही जेव्हा घटनास्थळी पोहोचलो. तेव्हा सगळीकडे धूर पसरला होता. जखमी मदतीसाठी याचना करत होते. आम्ही जखमींना मदत केल्यानंतर सोने, रोकड आणि प्रवाशांची कागदपत्रे गोळा करण्याचे दुसरे महत्त्वाचे काम केले. हा सर्व मुद्देमाल आम्ही नंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केला.
राजू पटेल म्हणाले की, घटनास्थळी पोहोचल्यानंतर पहिल्या १५ ते २० मिनिटांत आम्हाला काहीच करता आले नाही. आग खूपच भडकलेली होती. पण जेव्हा अग्निशामक दलाचे जवान पोहोचले, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकाही आली. तेव्हा आम्ही मदतीसाठी पुढे गेलो. सुरुवातीला स्ट्रेचर नसल्यामुळे आम्ही साडी आणि बेडशीटचा वापर करत जखमींना रुग्णवाहिकेत टाकले.
दुपारी ४ वाजेपर्यंत घटनास्थळावरील बचाव कार्य आटोपले. त्यानंतर पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवाशांच्या बॅगा बाजूला करण्याचे काम हाती घेतले. आम्हाला घटनास्थळी ७० तोळ्याचे सोन्याचे दागिने आढळून आले. तसेच ८० हजारांची रोकडही सापडली. गीतेची प्रत आणि काही बॅगांमध्ये पासपोर्टही आढळून आले, असेही राजू पटेल म्हणाले.
राजू पटेल पुढे म्हणाले की, यंत्रणांनी रात्री ९ वाजेपर्यंत आम्हाला अपघातस्थळी काम करण्याची संधी दिली. याबद्दल मी त्यांचा नेहमीच आभारी राहिल.
राज्यमंत्री हर्ष सिंघवी म्हणाले की, अपघातस्थळी ज्या मौल्यवान आणि इतर महत्त्वाच्या वस्तू आढळून आल्या. त्यांची ओळख पटवून त्या मृतांच्या कुटुंबियांकडे स्वाधीन केल्या जातील.
राजू पटेल यांना समाजकार्याची आवड
राजू पटेल यांची बवाचकार्यात उतरण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी २००८ च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटातही त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले होते. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, “२००८ साली बॉम्बस्फोट झाला तेव्हा मी शासकीय रुग्णालयापासून केवळ १०० मीटर अंतरावर होतो. या स्फोटात अनेक लोक मरण पावले. पण यावेळी मी जी हानी पाहिली, मृतदेह पाहिले, हे चित्र कधीही विसरता येणार नाही.”
© IE Online Media Services (P) Ltd