Milan Bergamo Airport Italy: मंगळवारी सकाळी इटलीच्या मिलान बर्गामो विमानतळावर एक भीषण अपघात घडला. व्होलोटेआ विमान उड्डाणाच्या तयारीत असताना, इंजिनमध्ये अडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती स्पेनमधील अस्टुरियासला जाणाऱ्या एअरबस ए३१९ व्होलोटेआ विमानाच्या दिशेने धावत गेल्याचे वृत्त आहे. सकाळी १०:२० वाजता घडलेल्या या घटनेनंतर विमानतळावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती.
या अपघातानंतर स्थानिक वेळेनुसार १०:२० ते १२:०० दरम्यान विमान वाहतूक स्थगित करण्यात आली होती, असे वृत्तसंस्था रॉयटर्सने बर्गामो विमानतळाच्या निवेदनाचा हवाला देत दिले आहे.
विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनी सॅकबोने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, दुपारी हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. “हा अपघात झाल्यानंतर विमानतळावर येणारी आणि विमानतळावरून जाणारी सर्व उड्डाणे सकाळी १०:२० वाजता स्थगित करण्यात आली होती”, असे इटालियन वृत्तसंस्था ‘द लोकल’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, ३५ वर्षांचा एक व्यक्ती, ज्याचा पोलीस पाठलाग करत होते, तो धावत धावत थेट रनवेवर पोहोचला आणि विमानाच्या इंजिनमध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला. ही व्यक्ती ना प्रवासी होती, ना विमानतळावरील कर्मचारी. विमानतळाच्या लगेज विभागाजवळील एका सुरक्षा दरवाजामार्फत त्याने रनवेवर प्रवेश केला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
“आमच्या फ्लाइटशी संबंधित अपघाताच्या घटनेची आम्ही चौकशी करत आहोत. ही घटना विमानात प्रवाशांचे बोर्डिंग पूर्ण झाल्यानंतर आणि विमान उड्डाणासाठी तयार असताना घडली”, असे संबंधित एअरलाइन कंपनी व्होलोटेआने एका निवेदनात म्हटले आहे.
लाईव्ह फ्लाइट ट्रॅकर एजन्सी फ्लाईटराडार२४ नुसार, या घटनेमुळे किमान १९ उड्डाणे रद्द करण्यात आली, तर बर्गामो विमानतळाकडे येणारी नऊ उड्डाणे इतर इटालियन विमानतळांवर वळवण्यात आली. यामध्ये मिलान मालपेन्सा येथे वळवलेल्या सहा उड्डाणांचा समावेश आहे.