माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माथेफिरु माणसाने त्याच्या कुटुंबातल्या पाच जणांची हत्या करुन त्यानंतर आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या माणसाने सर्वात आधी स्वतःच्या आईवर गोळ्या झाडल्या आणि तिला संपवलं. त्यानंतर हातोड्याचे वार करुन पत्नीला ठार केलं. एवढ्यावरच थांबला नाही तर तीन मुलांना छतावरुन फेकलं आणि त्यांचीही हत्या केली. हे कृत्य केल्यानंतर या माणसाने स्वतःही आत्महत्या केली.

कुठे घडली आहे ही घटना?

उत्तर प्रदेशातल्या सीतापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आपल्याच कुटुंबातल्या पाच जणांची हत्या करुन एका माणसाने त्याचं आयुष्य संपवलं आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत. त्यांनी सगळे मृतदेह ताब्यात घेतले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसंच या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा- अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड, लैलाच्या सावत्र वडिलांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले

नेमकं काय घडलं?

पाल्हापूर या ठिकाणी राहणारे शेतकरी वीरेंद्र सिंह यांचा मुलगा अनुराग सिंह यांनी या हत्या केल्या आणि त्यानंतर स्वतःचं आयुष्य संपवलं. अनुराग सिंहने त्याची आई सावित्री यांना आधी गोळ्या घातल्या आणि आईला ठार केलं. त्यानंतर पत्नी प्रियांका सिंहचं डोकं हातोडीने फोडलं, आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर मुलगी आष्वी, मुलगा अनुराग आणि मुलगी आरना या तिघांनाही छतावरुन खाली ढकलून दिलं. त्यानंतर अनुराग सिंहनेही आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पूर्ण गावात शोकसागरात बुडालं आहे. अनुराग सिंह हा मानसिक आजार असलेला माणूस होता अशीही माहिती कळते आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. अनुराग सिंहने कुटुंबातल्या पाच जणांची हत्या केल्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली अशीही माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी या प्रकरणी काय म्हटलं आहे?

सीतापूरचे एसएसपी चक्रेश मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली की, रामपूर पोलीस ठाण्यात ही माहिती आम्हाला मिळाली की मानसिक आजार असलेल्या अनुराग सिंह या व्यक्तीने आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने आईवर गोळ्या झाडून तिला ठार केलं. तसंच पत्नीला हातोड्याचे वार करुन मारलं आणि मुलांना छतावरुन फेकून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. आम्ही सगळे मृतदेह ताब्यात घेतले आहेत ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे. पोलीस आणि एफएसएलचं पथक पुढील तपास करत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.