मंगळवारी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सच्या उत्तर-पश्चिम भागांच्या दौर्‍यावर गेले होते. दरम्यान एक विचित्र घटना घडली. एका व्यक्तीने थेट राष्ट्राध्यक्षांच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.  मॅक्रॉन लोकांकडून एकेक करून शुभेच्छा स्वीकारत होते. दरम्यान, त्यांनी एका व्यक्तीला हस्तांदोलन केले. तर त्या व्यक्तीने त्यांच्यावर हात उगारला. त्यामुळे एकच धांदल उडाली होती.

मॅक्रॉनला यांना लगावलेली चापट इतकी जोरदार होती की ते काही पावले मागे सरकले. दरम्यान, सुरक्षा कर्मचार्‍यांनी रेलिंगजवळ येऊन हल्लेखोराला पकडले. मॅक्रॉन गेले काही दिवस फ्रान्सच्या देशव्यापी दौर्‍याच्या दुसर्‍या टप्प्यात व्यस्त आहेत. स्थानिक वृत्तानुसार, चापट मारल्यानंतर जवळपास उभे असलेले लोकं जोरात ओरडले. त्याचवेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन जणांना अटक केली आहे. फ्रेंच पोलिसांचे म्हणणे आहे की, पोलीस या दोघांची चौकशी करत आहेत आणि हल्ल्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दुपारी झालेला हा हल्ला राष्ट्रपतींच्या सुरक्षेत मोठी चूक मानली जात आहे. हल्ला होण्यापूर्वी अध्यक्ष एका हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना भेटून बाहेर आले होते. दरम्यान त्यांना भेटायला हताश झालेल्या जमावाला अभिवादन करण्यासाठी तेथे गेले होते. त्या ठीकाणी ही विचित्र घटना घडली.

मॅक्रॉन पुढच्या वर्षी होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीची तयारी करत आहेत. निवडणुकीच्या सर्वेक्षणात दक्षिणपंथी नेते मरीन ले पेन मॅक्रॉन यांच्यापेक्षा आघाडी आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत मॅक्रॉनने बर्‍याच भागात प्रवास करण्याची योजना आखली आहे. मॅक्रॉन थेट लोकांना भेटण्याचा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.