लंडन : इंग्रजी साहित्यविश्वात मानाच्या ओळखल्या जाणाऱ्या बुकर पुरस्काराच्या निवडीसाठी यंदा सर्वाधिक चुरस झाली. परीक्षक मंडळाने अंतिम निकालाच्या दिवशी पाच तासांहून अधिक काळ चर्चा करीत नियमांना बगल देऊन अखेर कॅनेडियन लेखिका मार्गारेट अॅटवूड आणि आफ्रो-ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन एव्हरिस्टो यांच्या पुस्तकांना संयुक्तपणे पुरस्कार जाहीर केला.
दोघींचे नाव पुकारण्यात आल्यानंतर त्या हातात हात घालूनच पुरस्कार स्वीकारण्यासाठी सामोऱ्या गेल्या. अॅटवूड म्हणाल्या की, हा पुरस्कार मला एकटीलाच मिळाला असता तर जरा अडचणीचे वाटले असते, पण आता माझ्याबरोबर एव्हरिस्टो याही आहेत. १९९२ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली असताना पुरस्काराचे नियम बदलून दोन जणांना एकाचवेळी पुरस्कार द्यायचा नाही असे ठरले होते, पण यावेळी पाच तासांच्या चर्चेनंतर परीक्षक समितीचे प्रमुख पीटर फ्लॉरेन्स यांनी आम्ही हा नियम बदलत आहोत असे जाहीर करून दोघींना पुरस्कार जाहीर केला.
एव्हरिस्टो यांनी सांगितले की,‘आता माझे साहित्य बऱ्याच मोठय़ा समुदायापर्यंत पोहोचणार आहे. कृष्णवर्णीय महिलेला हा पुरस्कार प्रथमच मिळाला आहे, इतर कुणाला या पुरस्काराचे कदाचित अप्रुप वाटणारही नाही पण माझ्यासाठी ते आहे.आणखी कृष्णवर्णीय महिलांनी हा पुरस्कार मिळवावा अशी अपेक्षा आहे.’
अॅटवूड यांनी सांगितले की, ‘बर्नार्डिनबरोबर हा पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे, तिने कृष्णवर्णीय महिलांना मोठा आत्मविश्वास दिला आहे.’
अॅटवूड यांना ‘द ब्लाइंड अॅससिन’ या पुस्तकासाठी यापूर्वी बुकर पुरस्कार मिळाला होता. नंतर ‘द हँडमेड्स टेल’ या पुस्तकाला नामांकनही मिळाले होते. १९८५ साली आलेल्या या पुस्तकातील कथानकाचे अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने निर्माण केलेल्या वातावरणाशी साधर्म्य आहे. त्यामुळे २०१७ नंतर या पुस्तकाला नव्याने लोकप्रियता मिळाली. त्यावर टीव्ही मालिका आली. त्यानंतर त्यांनी ‘द हँडमेड्स टेल’चा उत्तरार्ध ‘द टेस्टामेण्ट्स’मध्ये मांडला. या पुस्तकाच्या १ लाख प्रति ब्रिटनमध्ये विकल्या गेल्या असून अमेरिकेत पहिली प्रत पाच लाख इतक्या मोठय़ा संख्येची छापण्यात आली. प्रकाशनानंतर चार आठवडय़ात ब्रिटनमध्ये सर्वाधिक खपाचा गेल्या चार वर्षांतील विक्रम या कादंबरीने मोडला आहे.
नवा इतिहास..
अॅटवूड यांची टेस्टामेण्ट्स आणि एव्हरिस्टो यांची ‘गर्ल,वुमन, अदर’ या कादंबऱ्यांनी अखेर बुकर पुरस्कारावर मोहोर उमटवली. एकूण पन्नास हजार पौंडांचा हा पुरस्कार दोघींना विभागून दिला जाणार आहे. बुकरच्या नियमानुसार हा पुरस्कार विभागून देता येत नाही पण यावेळी परीक्षकांनी अपवाद करून दोन्ही पुस्तके तोडीस तोड असल्याने विभागून पुरस्कार दिला आहे. अॅटवूड या बुकर पुरस्कार पटकावणाऱ्या सर्वात वयोवृद्ध विजेत्या असून एव्हरिस्टो यांच्या रूपाने प्रथमच कृष्णवर्णीय महिलेस हा मान मिळाला आहे.
एव्हरिस्टो यांची आठवी कादंबरी
गर्ल, वुमन अदर ही एव्हरिस्टो यांची आठवी कादंबरी आहे. प्रत्येक प्रकरणात १२ पात्रे एकत्र गुंफलेली आहेत. ती बहुतांश कृष्णवर्णीय ब्रिटिश महिलांची आहेत. शंभर वर्षांचा कालपट यात असून समकालीन साहित्यात आजपर्यंत जे चित्रण आले नाही असे जीवन यात रेखाटले आहे. एव्हरिस्टो यांनी नाटकातून कारकीर्द सुरू केली असून त्यांनी १९८२ मध्ये ‘थिएटर ऑफ दी ब्लॅक वुमन’ ही संस्था स्थापन केली. याशिवाय त्यांनी ‘दी स्प्रेड दी वर्ड रायटर डेव्हलमेट एजन्सी’ ही संस्था सुरू केली.