मंगळावर जाणाऱ्या अवकाशवीरांना स्मृतिभ्रंशाचा धोका होऊ शकतो कारण अवकाशातील वैश्विक किरणांतून त्यांच्या शरीरावर आदळणारे कण तसा परिणाम करू शकतात, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे चार्लस लिमोली व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, उच्च ऊर्जेचे कण दीर्घकालीन अवकाशमोहिमांत अवकाशवीरांच्या शरीरावर आदळू शकतात, त्यामुळे मेंदूचा दीर्घकालीन ऱ्हास होऊ शकतो असे उंदरांवरील प्रयोगात दिसून आले आहे. त्यामुळे आकलन कमी होणे, स्मृतिभ्रंश होणे असे परिणाम होऊ शकतात. यापूर्वी वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात वैश्विक किरणांचे परिणाम अल्पकालीन असतील असे म्हटले होते पण नवीन संशोधनानुसार ते दीर्घकालीन असतील. मंगळावर स्वारी करण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही चांगली बातमी नाही.

मंगळाचा प्रवास हा दोन-तीन वर्षांचा असेल त्यात हा धोका परवडणारा नाही असे लिमोली यांनी सांगितले. अवकाशात अंतराळवीरांना अनेक धोके असतात त्यामुळे त्यांच्या चेतासंस्थेला इजा होऊ शकते व तो ऱ्हास कायमचा असतो, त्यांना नैराश्य, अवसाद, निर्णय क्षमतेत अडथळे असे धोके असतात. आकलनातील बिघाड कायम राहू शकतो. उंदरांवर ऑक्सिजन व टिटॅनियमचे भारित कण आदळवण्याचा प्रयोग नासाने स्पेस रेडिएशन लॅबोरेटरी येथे करण्यात आला व नंतर त्याची माहिती विश्लेषणासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठाला देण्यात आली. सहा महिन्यांनंतर उंदरांमध्ये न्यूरॉन्सची हानी झालेली दिसून आली. प्रतिमाचित्रणात असे दिसले की, मेंदूचे न्यूरॉन नेटवर्क बिघडून त्यात डेंड्राइट व स्पाइन्स यांच्या संख्येत घट झालेली दिसली त्यामुळे मेंदूच्या पेशीतील संदेश वहन बिघडले. त्यामुळे वर्तन व आकलनावर परिणाम होऊन स्मृतीनाश दिसून आला.

भीती घालवणारा एक भाग मेंदूत असतो तो अप्रिय व वाईट अनुभव गाळून टाकत असतो त्या भागात प्रारणांच्या माऱ्यामुळे बिघाड झाला, त्यामुळे नैराश्य व अवसाद वाढतो, मंगळावर जाणाऱ्या अवकाशवीरांना या धोक्यांचा सामना करावा लागेल असे लिमोली यांचे म्हणणे आहे.