भारताच्या मंगळयानाच्या प्रवासास शंभर दिवस पूर्ण झाले असून हे यान वेगाने मंगळाच्या दिशेने जात आहे. मंगळाच्या दिशेने यानाने सत्तर टक्के प्रवास पूर्ण केला आहे. आता त्याच्या प्रवासाला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. २४ सप्टेंबरला हे मंगळयान म्हणजे ‘मार्स ऑरबायटर’ मंगळाजवळ पोहोचणार असून त्यावेळी त्याची तांत्रिक कसोटी लागणार आहे असे भारतीय अंतराळ संशोधनाच्या बंगळुरू येथील मुख्यालयातून सांगण्यात आले. मार्स ऑरबायटर वेगाने मंगळाच्या दिशेने सुमारे ३०० दिवस प्रवास करणार असून आता पुढच्या टप्प्यात ते अवकाशात खोलवर म्हणजे१०.८० कोटी किलोमीटर कि.मी अंतरावर जाईल. मंगळयानाचा संदेश पृथ्वीवर पोहोचण्यास सहा मिनिटे लागणार आहेत. मंगळयानावर सहा पेलोड असून त्यांची स्थिती व्यवस्थित आहेत, इस्रोने मंगळमोहिमेचे फेसबुकपेजही तयार केले आहे. या प्रकल्पाला ४५० कोटी रुपये खर्च आला होता व ग्रहीय संशोधनातील ही सर्वात किफायतशीर मोहीम मानली जाते. हे यान मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास पाच पेलोडच्या मदतीने करणार आहे.
एका महत्त्वाच्या घडामोडीत इस्रोने ११ जूनला सायंकाळी साडेचार वाजता २२ न्यूटनचे दोन थ्रस्टर्स १६ सेकंद प्रज्वलित करून मंगळयानाला दिशा दिली. यात मार्गात सुधारणा केली जाते. यापुढे ऑगस्टमध्ये मार्गात अशी सुधारणा केली जाईल व नंतर हे यान मंगळाच्या दिशेने सप्टेंबरमध्ये अंतिम टप्प्यात जाईल. मंगळ मोहिमेत मार्स ऑरबायटर यान आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने ५ नोव्हेंबरला पाठवण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars orbiter spacecraft mangalyaan completed 70 journey