Meerut Merchant Navy Officer Murder: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याची त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली आहे. तसेच हत्या करून पतीच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि सिमेंटने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये ते लपवले. पोलिसांनी आता मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ राजपूत नुकताच लंडनहून भारतात परतला होता. २०१६ रोजी सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला होता. मेरठ येथे एका भाड्याच्या घरात हे जोडपे पाच वर्षांच्या मुलीसह तीन वर्षांपासून राहत होते. सौरभ शेवटचा ४ मार्च रोजी दिसला होता, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलने सौरभचा ४ मार्च रोजी खून केल्याचे मान्य केले. खून केल्यानंतर दोघांनी सौरभच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि ते प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकून त्यात काँक्रिट भरले. संतापजनक बाब म्हणजे सौरभचा खून केल्यानंतर मुस्कान प्रियकर साहिलबरोबर थंड हवेच्या ठिकाणी सहलीसाठी गेली.

मुस्कानच्या आईमुळे गुन्हा झाला उघड

मुस्कानच्या आईनेच पोलिसांना आपल्या मुलीच्या कृत्याची माहिती दिल्यानंतर सदर गुन्हा उजेडात आला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला अटक केली. तसेच ज्या ड्रममध्ये सौरभचा मृतदेह काँक्रिटमध्ये पुरण्यात आला होता. तोही ड्रम ताब्यात घेतला. तब्बल दोन तास या ड्रममधून पोलीस मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. काँक्रिट टणक झाल्यामुळे तो तोडण्यासाठी उशीर लागला.

स्थानिकांची चौकशी केली असताना त्यांनी सांगितले की, मुस्कानने काही दिवसांपूर्वीच घराला टाळे ठोकले होते. ती आणि पती सौरभ हिमाचल प्रदेशलला फिरायला जात असल्याचे तिने शेजाऱ्यांना सांगितले होते. या काळात ती सौरभच्या मोबाइलवरून त्याच्या कुटुंबियांना मेसेज पाठवत होती. जेणेकरून सर्वांची दिशाभूल करता येईल.

पोलिसांनी काय सांगितले?

मेरठचे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष विक्रम यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. “आम्हाला सदर गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही चौकशी सुरू केली. तपासात निष्पन्न झाले की, मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारे सौरभ राजपूत ४ मार्चपासून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. दोघांनीही आपला गुन्हा मान्य केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Merchant navy officer killed by wife and her lover hides dismembered body in drum kvg