एपी, स्टॉकहोम
ऑस्ट्रेलियाचे रिचार्ड रॉब्सन, जपानचे सुसुमू किटागावा आणि अमेरिकेचे ओमार याघी यांना बुधवारी रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. त्यांनी ‘मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क’ (एमओफ) विकसित करण्यासाठी संशोधन केले आहे. त्यांचे या क्षेत्रातील संशोधन १९८९ पासूनचे आहे. ‘रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’चे सरचिटणीस हंस एलेग्रिन यांनी रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर केले.

या आठवड्यातील जाहीर झालेले हे तिसरे नोबेल आहे. आधुनिक काळात मोठ्या प्रमाणावर उपयुक्त असलेली ‘एमओएफ’ रचना आणि त्यातील संधींची मोठी दालने या संशोधनामुळे खुली झाली. या क्षेत्रात तिघांनीही स्वतंत्रपणे संशोधन केले आहे. मात्र, प्रत्येकाने एकमेकांच्या संशोधनात भर घातली आहे. रॉब्सन (वय ८८) हे ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न विद्यापीठातील आहेत. किटागावा (वय ७४) हे जपानच्या क्योटो विद्यापीठातील आणि याघी हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील आहेत.

रसायनाशास्त्रातील नोबेल देण्यासाठी नियुक्त समितीचे अध्यक्ष हेनर लिंक म्हणाले, ‘नोबेल जाहीर झालेल्या तीन शास्त्रज्ञांनी नव्या रूपातील रेणूंची रचना विकसित केली आहे. ही रचना अशी विकसित केली गेली, की त्यामधून वायू आणि इतर रसायनांचेही वहन होईल. ही रचना म्हणजे ‘एमओएफ’. या रचनेची क्षमता प्रचंड आहे. संधींची अनेक नवी दालने त्यामुळे खुली झाली आहेत. नोबेल समितीचे सदस्य ऑलोफ रॅम्स्ट्रॉम यांनी सांगितले, की हे संशोधन ‘हॅरी पॉटर’ या काल्पनिक कथेतील जादुई बॅगेप्रमाणे आहे. बॅग वरून दिसायला छोटी असते. मात्र, आतून अतिशय भव्य. तशीच ही रचना असते. गेल्या वर्षी सिएटलमधील डेव्हिड बेकर हे जैवरसायनशास्त्रज्ञ, ब्रिटनमधील ‘गूगल डीपमाइंड’ येथे काम करणारे डेमिस हसबिस, जोन जम्पर यांना रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर झाले होते.

या पुरस्काराने माझा खूप मोठा सन्मान झाला आहे. माझ्या दीर्घ काळाच्या संशोधनाची दखल घेतल्याने आनंद झाला आहे. – सुसुमू किटागावा, शास्त्रज्ञ, नोबेलविजेते

संशोधनाची उपयुक्तता

‘एमओएफ’मधील संशोधनामुळे संधींची अनेक दालने खुली झाली. या संशोधनाची तुलना करायची झाल्यास ती लाकडी घराच्या चौकटीशी करता येईल. ‘एमओएफ’ त्यांच्या रचनेमधील वायू शोषून घेतात, साठवू शकतात. या रचनेची आज अनेक ठिकाणी उपयुक्तता आहे. वातावरणातून कार्बन डायऑक्साइड शोषून घेणे किंवा शुष्क अशा हवेतून पाणी शोषून घेणे, विषारी वायू साठविण्यासाठी किंवा रासायनिक प्रक्रियांच्या उत्प्रेरकांमध्ये ही रचना कामी येते.