मायक्रोसॉफ्ट कंपनीतील काही कर्मचार्‍यांसाठी २०२३ हे वर्ष फार चांगलं सुरू झालं नाही. या कंपनीने मार्च २०२३ च्या अखेरपर्यंत १० हजार लोकांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पाच टक्के कर्मचारी कमी करण्याची मायक्रोसॉफ्ट कंपनीची योजना आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला नोकर कपात करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीत २१ वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या एका भारतीय व्यक्तीने नोकरी गमावली आहे. नोकरीवरून काढल्यानंतर संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट लिहून मायक्रोसॉफ्ट कंपनीचे आभार मानले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संबंधित व्यक्तीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की, “आज माझं मायक्रोसॉफ्ट कंपनीतील पद काढून टाकण्यात आलं आहे. याबाबत विचार करताना, मला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त कंपनीबाबत कृतज्ञतेची भावना वाटत आहे. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर मी पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्ट कंपनीत रुजू झालो होतो. परदेशी भूमीवर नोकरीसाठी गेल्यानंतर माझा सुरुवातीचा अनुभव कसा होता? तो आजही मला आठवतो. मायक्रोसॉफ्टमध्ये २१ वर्षांहून अधिक काळ काम करताना मला अनेक भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडता आल्या. हे माझ्यासाठी खरोखरच समाधानकारक आणि खूप शिकवणारं होतं.”

हेही वाचा- आधी वडील गेले, आता नोकरी; अ‍ॅमेझॉनमधल्या भारतीय कर्मचाऱ्यावर दु:खाचा डोंगर

“येथे काम करताना खूप शिकायला मिळालं आणि यातूनच मला मोठा होता आलं. मायक्रोसॉफ्ट कंपनीने मला कौशल्ये शिकण्याच्या अनेक संधी दिल्या. याचा मी पुरेपूर फायदा घेऊ शकलो. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला मिळालेल्या अनुभवाची संपत्ती केवळ वर्षांमध्ये मोजता येणार नाही. ती खरोखरच अतुलनीय आहे. या सर्व बाबींसाठी मी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा ऋणी आहे,” अशा आशयाचं पत्र संबंधित व्यक्तीने लिहिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft company fired indian man after working for 21 years wrote emotional post rmm