रिव्हरसाइड (अमेरिका) : कॅलिफॉर्नियातील मार्च एअर रिझव्‍‌र्ह तळाबाहेर एफ-१६ हे लढाऊ विमान एका गोदामावर कोसळल्याची घटना गुरुवारी घडली. सुदैवाने या दुर्घटनेतून वैमानिक बचावला आहे, त्याचप्रमाणे दुर्घटना घडली त्यावेळी गोदमात कोणीही कर्मचारी नसल्याने अनर्थही टळला आहे.

दक्षिण कॅलिफॉर्नियातील हवाई दलाच्या तळाजवळील गोदामावर एफ-१६ हे लढाऊ विमान कोसळले, प्रशिक्षणासाठी या विमानाने उड्डाण केले होते, विमान कोसळण्यापूर्वीच वैमानिकाने पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. विमान कोसळल्यानंतर त्याला आगही लागली, मात्र तातडीने ती आटोक्यात आणण्यात आली. विमान का कोसळले, त्याची चौकशी सुरू असून वैमानिकाला दुखापत झाली आहे का, त्याचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.

‘भीषण अनुभव’

गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली, विमान कोसळले त्यावेळी गोदामाजवळ एक व्यक्ती होती. बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज झाला, प्रथम काय झाले ते कळले नाही, मात्र कालांतराने विमान गोदामावर कोसळले असल्याचे लक्षात आले, तो भीषण अनुभव होता, असे या व्यक्तीने सांगितले.