व्यवस्था, यंत्रणा या सामान्य माणसांना डावलून सरकारमधील नेत्यांसाठी कशा काम करतात, याचे ज्वलंत उदाहरण उत्तर प्रदेशच्या हमीरपूर येथे निदर्शनास आले आहे. मानवतेला अशरक्षः लाज आणणारी घटना याठिकाणी घडली. हमीरपूर येथील यमुना नदीवरील पुलाची दुरूस्ती सुरू असल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतूक बंद असली तरी याठिकाणाहून एका आमदाराची गाडी सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलिसांनी सोडली. मात्र त्याचवेळी रुग्णवाहिकेतून आईचं पार्थिव घेऊन जाणाऱ्या मुलाला मात्र अडविण्यात आलं. त्यामुळं मुलाला रुग्णवाहिकेच्या चालकासह आईचा मृतदेह स्ट्रेचरवरून एक किमीपर्यंत पायी चालत न्यावा लागला.
या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. आईच्या मृत्यूमुळं आधीच खचलेल्या मुलानं पोलिसांचे हात-पाय पकडून विनवणी केली. त्यांना त्याची अडचण सांगितली. तरीही पोलीस काहीच ऐकण्यास तयार नव्हते. अखेर या मुलाला स्ट्रेचरवरून आईचा मृतदेह पलीकडच्या बाजूस न्यावा लागला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. कानपूर-सागर महामार्ग एनएच-४ वर हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. स्ट्रेचरच्या एका बाजूला दुःखी मुलगा आणि दुसऱ्या बाजूला रुग्णवाहिकेचा चालक आहे. तर सोबत आरोग्य कर्मचारी आणि एक नातेवाईकही चालत असल्याचं दिसत आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूला पायी चालत गेल्यानंतर तिथून ऑटोरिक्षामधून पार्थिव घरी नेण्यात आले.
प्रकरण काय आहे?
कानपूर-सागर महामार्गाचा यमुना नदीवर असलेल्या पुल नादुरुस्त झाल्यामुळे त्याच्या दुरूस्तीचे काम शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून चालू झाले. या कामामुळे दोन दिवसांसाठी याठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ६.४४ मिनिटांनी आमदार मनोज प्रजापती याठिकाणाहून जात असल्यामुळे पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स हटवले.
त्यानंतर तीन तासांनी सकाळी ९.३० वाजता बिंदा नावाचा तरूण आपल्या आईचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिकेद्वारे कानपूरहून येत होता. मात्र पोलिसांनी रुग्णवाहिकेला जाण्याची परवानगी दिली नाही. यामुळे बिंदाला त्याच्या आईचं पार्थिव स्ट्रेचरवरून एक किमीपर्यंत न्यावं लागलं. तिथून पुढे ते ऑटोनं गेले.
दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवर जोरदार टीका होत आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. “दुर्दैवी, बाकी काही नाही”, असे कॅप्शन देऊन त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
हमीरपूरचे जिल्हाधिकारी म्हणाले की, शनिवार आणि रविवारी पूल बंद ठेवणार असल्याची माहिती आधीच देण्यात आली होती. तरीही लोक इथून येत होते. रुग्णवाहिकेने पर्यायी मार्गाचा अवलंब करायला हवा होता. मात्र आमदाराची गाडी का सोडली, याची माहिती माझ्याकडे नसल्याचे ते म्हणाले.
आमदारांनी काय म्हटलं?
तर आमदार प्रजापती सारवासारव करताना म्हणाले की, माझ्या भावाची प्रकृती खूप खालावली होती. त्याला हमीरपूर येथून कानपूरला नेणे आवश्यक होते. आम्ही ज्यावेळी तिथून गेलो, तोपर्यंत पूल पूर्णपणे बंद करण्यात आला नव्हता.