काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्या आईला मिळणारी व्हीआयपी सुरक्षा मंगळवारी हटवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर मोठा वाद सुरू होता. गेल्याच आठवड्यात काँग्रेसने मोदी सरकारला वडेरा यांच्या आईला सुरक्षा का पुरवण्यात येत आहे, असा सवाल विचारला होता. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारने अखेर रॉबर्ट वडेरांच्या आई मॉरिन वडेरांना देण्यात येत असलेली व्हीव्हीआयपी सुरक्षा मंगळवारी मागे घेतली.
रॉबर्ट यांच्या आई मॉरिन वडेरा या न्यू फ्रेंड्स कॉलनीत राहतात. गेल्या १३ वर्षांपासून त्यांच्यासाठी दिल्ली पोलिसांचे ६ सुरक्षा रक्षक २४ तासांसाठी तैनात होते. यावर काँग्रेसचे प्रवक्ते अजयकुमार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. वडेरा यांच्या आईला देण्यात येणाऱ्या सुरक्षेमागे काही कारण नसेल तर केंद्र सरकारने त्यांची सुरक्षा अद्याप का हटवलेली नाही, असा सवाल उपस्थित केला होता.
मॉरिन वडेरा यांच्या घरी तैनात सुरक्षा रक्षकानेही २००४ पासून त्यांना व्हीव्हीआयपी सुरक्षा देण्यात येत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्याचवर्षी काँग्रेसने केंद्रात पुन्हा एकदा सत्ता मिळवली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नंतर इतर माध्यमांमध्येही याबाबतचे वृत्त आल्यानंतर रॉबर्ट वडेरा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला होता.
काय लिहिल होतं फेसबुक पोस्टवर
खरच, आता आपण इतक्या खालच्या पातळीवर गेलो आहोत की, ज्येष्ठ नागरिकांनाही आपण सोडत नाहीए. त्यांना त्रास देत आहोत. कृपया माझ्या आईच्या मागे लागू नका. मला जी सुरक्षा किंवा सुविधा मिळाल्या आहेत. कृपया त्या हटवा. माझ्यासाठी त्या महत्वाच्या नाहीत. मी जोखीम घेईन. परंतु, आपणही काही शिष्टाचार पाळला पाहिजे…पत्रकारितेतील सर्वात वाईट काळ मी पाहत आहे.