Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताचा पुनरुच्चार केला आहे. मध्य प्रदेशच्या सतना या ठिकाणी मोहन भागवत बोलत होते. मोहन भागवत म्हणाले जेव्हा इतिहासाने आपले डोळे उघडले तेव्हा आपला भारत देश त्यांना उन्नतच दिसला. आपल्या ऋषी-मुनींनी हे सत्य शोधलं. या आधारावर एक राष्ट्र तयार झालं असं म्हटलं आहे.

सिंधी बांधवांचा मला अभिमान वाटतो-भागवत

मोहन भागवत पुढे म्हणाले, आज या ठिकाणी अनेक सिंधी बांधव आले आहेत. हे सिंधी बांधव कधीही पाकिस्तानला गेले नाहीत. ते अखंड भारतात आले होते. ही सवय नव्या पिढीपर्यंत पोहचली पाहिजे. कारण आपलं राष्ट्र म्हणजे आपलं एक घर आहे. या घराची एक खोली कुणीतरी हिसकावून घेतली. त्या खोलीत टेबल, खुर्ची, कपडे होते. पण ती खोली बळकवण्यात आली. आता ती खोली आपल्याला पुन्हा मिळवायची आहे असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं.

अखंड भारत हा आपला संकल्प आहे-मोहन भागवत

मोहन भागवत म्हणाले, अखंड भारत हा आपला संकल्प आहे. आपल्या एक गोष्ट ठरवायची आहे की भाषा, भजन, भवन, भ्रमण आणि भोजन हे सगळं आपलं असलं पाहिजे. जशी आपली परंपरा आहे तसंच हे हवं आहे. स्वतःला हिंदू न समजणारे लोक जेव्हा परदेशी जातात तेव्हा त्यांना हिंदी किंवा हिंदवी म्हटलं जातं. शिवाय आपल्याला असं का म्हटलं जातं आहे याचं त्यांना आश्चर्यही वाटतं. त्यांना काहीही वाटत असलं तरीही जगात आपली ओळख हिंदू म्हणून आहे यात शंका नाही. आपण हे सत्य स्वीकारलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असंही मोहन भागवत म्हणाले.

भाषेच्या वादावर काय म्हणाले मोहन भागवत?

भाषा अनेक असतात, पण भाव एक असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक भाषा या मूळ भाषेतूनच जन्माला आल्या आहेत. सगळ्या भाषा या भारताच्या राष्ट्रीय भाषा आहेत. प्रत्येक नागरिकाला किमान तीन भाषा आल्या पाहिजेत. घरातली भाषा, राज्याची आणि राष्ट्राची भाषा अशा तीन भाषा येणं आवश्यक आहे असंही मोहन भागवत म्हणाले. मोहन भागवत यांच्या हस्ते सतना या ठिकाणी बाबा मेहरशाह दरबार या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. त्यानंतर मोहन भागवत यांचं भाषण झालं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.