Montha Cyclone Alert : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आहे. त्यामुळे चक्रीवादळ आलं असून या चक्रीवादळाला मोंथा असं नाव देण्यात आलं आहे. हे मोंथा चक्रीवादळ मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ येऊन धडकलं आहे. हे वादळ आता आंध्र प्रदेशातून पुढे जाण्यासाठी तीन ते चार तास लागणार आहेत.

आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळ चक्रीवादळ धडकणार असल्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तेथील शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. तसेच या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ताशी ११० किमी वेगाने वारे वाहत असल्याने सोमवारपासूनच किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत.

मोंथा हे गेल्या सहा तासांत १७ किमी प्रति तास एवढ्या वेगाने वायव्येकडे सरकलं आणि ते मछलीपट्टनम (आंध्र प्रदेश) पासून तब्बल १२० किमी पूर्वेला काकीनाडा (आंध्र प्रदेश) पासून ११० किमी दक्षिणेस, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) पासून २२० किमी नैऋत्येला आणि गोपाळपूर (ओडिशा) पासून ४६० किमी नैऋत्येला स्थित आहे, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे.

पुढील तीन ते चार तासांत मोंथा चक्रीवादळउत्तर-वायव्येकडे सरकत राहील. दरम्यान, मोंथा चक्रीवादळाचा तेलंगणा, तामिळनाडू, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. तसेच या राज्यांत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

आंध्र प्रदेश सरकारने चक्रीवादळग्रस्त सात जिल्ह्यांमध्ये कृष्णा, एलुरु, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, काकीनाडासह आणखी काही भागात बुधवारी रात्री ८:३० ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तसेच रात्रीच्या संचारबंदीतून फक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवांनाच सूट देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी रहिवाशांना घरातच राहण्याचं, अनावश्यक प्रवास टाळण्याचं आणि अधिकृत सुरक्षा सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना या जिल्ह्यांमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांसह सर्व रस्ते वाहतूक बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.