Most Overworked Countries in World : आपल्याकडे साधारण ९ ते ५ ही ऑफिसची वेळ असते. मात्र, काम इतकं असतं की अनेकदा अतिरिक्त वेळ थांबून काम करावं लागतं. अर्थात, ही परिस्थिती आपल्याच देशात आहे असं नाही, तर जगात इतर अनेक देश आहेत, ज्या देशातील नागरिक अतिरिक्त वेळ थांबून काम करतात. दरम्यान, यासंदर्भात नुकतीच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने एक आकडेवारी जाहीर केली आहे, ज्यात त्यांनी भारतासह इतर देशातील नागरिक आठवड्याला सरासरी किती तास काम करतात, यासंदर्भात माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार सर्वाधिक तास काम करणाऱ्या नागरिकांच्या पहिल्या १० देशांच्या यादीत भूतान हा पहिल्या क्रमांकावर आहे. भूताननंतर भारताचा दुसरा, तर बांगलादेशचा तिसरा क्रमांक लागतो. याशिवाय भारताचा शेजारी असलेला पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. भूतानमधील ६१ टक्के नागरिक प्रत्येक आठड्याला सरासरी ४९ तासांपेक्षा जास्त काम करतात, तर भारतातील नागरिक दर आठवड्याला सरासरी ४६.७ तास काम करतात. तसेच भारतातील ५१ टक्के नागरिक असेही आहेत, जे आठवड्याला ४९ तास किंवा त्यापेक्षा जास्त काम करतात. याशिवाय बांगलादेशातील ४७ टक्के नागरिक ४९ किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करतात, तर पाकिस्तानातील ४० टक्के नागरिक ४९ किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करतात.

हेही वाचा – जगण्यासाठी शिकार महत्त्वाची! वाऱ्याच्या वेगाने आला सिंह अन् केला चित्यावर हल्ला; पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा

महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या या यादीतील पहिल्या १० देशांमध्ये दक्षिण आशियातील देश आहेत. यावरून या देशातील नागरिक अतिरिक्त वेळ थांबून काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय अरुबातील नागरिक सरासरी ३९.४ तास काम करतात. तर चीनमधील नागरिक ४६.१ तास, क्रोएशियातील नागरिक ३७.९ तास, जॉर्जियातील नागरिक ४०.५ तास, जर्मनीतील नागरिक ३४.२ तास, आयल ऑफ मॅनमधील नागरिक ३५ तास, जपानमधील नागरिक ३६.०६ तास, न्यू जर्सीतील नागरिक ४० तास आणि सिंगापूरमधील नागरिक सरासरी ४२.६ तास काम करत असल्याचे या अहवालात म्हटलं आहे.

कोणत्या देशातील नागरिक सर्वात कमी काम करतात?

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आकडेवारीनुसार असेही काही देश आहेत, जिथे नागरिक ४९ किंवा त्यापेक्षा कमी तास काम करतात. अशा देशांच्या यादीत वानुआतू हा देश सर्वात आधी येतो. या देशातील नागरिक दर आठवड्याला सरासरी २४.७ तास काम करतात. याशिवाय किरिबाटी या देशांतील नागरिकही दर आठवड्याला सरासरी २७.३ तास, तर फेडरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिया येथील नागरिक दर आठवड्याला सरासरी ३०.४ तास काम करतात. तसेच युरोपमधील नेदरलँड्समधील नागरिक सरासरी ३१.६ तास, तर नॉर्वे येथील नागरिक ३३.७ तास काम करतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most overworked countries in the world where is india ranks in list know in details spb
Show comments