मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात २२ हत्या करणारा मोस्ट वाँटेड आरोपी किशोर तिवारी उर्फ किस्सू तिवारी याला पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने अटक केली आहे. किस्सू तिवारी अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी आला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. मध्य प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर ५५ हजारांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. किस्सू तिवारीला अटक करण्यात आली आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस आणि मध्य प्रदेश पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली.

पोलीस सूत्रांनी काय माहिती दिली?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका हत्येच्या प्रकरणात किस्सू तिवारीला जामीन मिळाला होता. त्यानंतर किस्सू तिवारी उर्फ किशोर तिवारीच्या विरोधात ५५ हजार रुपयांचं इनाम जाहीर करण्यात आलं आहे. पोलीस दीर्घकाळापासून किशोर तिवारी उर्फ किस्सूचा शोध सुरु केला होता. मात्र पोलिसांना चकमा देण्यात तो प्रत्येकवेळी यशस्वी होत होता. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडलं होतं. पण किस्सू सापडत नव्हता. अखेर राम मंदिरात वेश बदलून दर्शनासाठी आलेल्या किशोर तिवारीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी खबऱ्यांचं नेटवर्कही केलं होतं सक्रिय

किशोर तिवारीला अटक करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांचं नेटवर्कही सक्रिय केलं होतं. जबलपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदित्य प्रताप सिंह आणि कटनीचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिजित रंजन यांनी संयुक्त बैठक घेतली. तसंच आरोपी किस्सू तिवारीला अटक करण्याचे निर्देश दिले होते. किस्सूला अटक करण्यासाठी पोलिसांची पथकंही तयार करण्यात आली होती. पोलिसांनी खबऱ्यांचं नेटवर्क कामाला लावलं होतं आणि किस्सूची काही माहिती समोर येते का त्याचा अंदाज घेतला जात होता. एबीपी न्यूजने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली माहिती

पोलिसांना खबऱ्यांकडून किस्सू तिवारी हा अयोध्येतील राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणार आहे ही माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी किशोर तिवारी उर्फ किस्सू तिवारीला अटक करण्यासाठी सापळा रचला. किस्सू तिवारी वेशांतर करुन म्हणजेच साधूच्या वेशात अयोध्येतील राम मंदिरात आला. त्यावेळी कटनीच्या पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. किस्सूला आता कटनी या ठिकाणी आणण्यात आलं आहे. किस्सू तिवारी पोलिसांना चकमा देऊन फरार झाल्यानंतर जयपूर, हरिद्वार, हिमाचल अशा ठिकाणी जाऊन लपला होता. प्रत्येक वेळी तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.

हे पण वाचा- दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अद्याप जिवंत, ९ वर्षांनी छोटा राजनचा फोटो आला समोर

किस्सू तिवारीच्या विरोधात २२ हत्यांचा आरोप आहे. तसंच त्याला अटक करण्यासाठी ८ डिसेंबर २०२१ पासून वॉरंट लागू करण्यात आला आहे. किस्सूच्या विरोधात हत्येचे कटनीमध्ये २० गुन्हे दाखल आहेत तर इंदूर आणि जबलपूर या ठिकाणी प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध मागच्या दीड वर्षापासून सुरु होता. अखेर राम मंदिरातून नाट्यमय पद्धतीने त्याला अटक करण्यात आली आहे.