RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यानंतर गुरुजी गोळवलकर हे संघाचे दुसरे सरसंघचालक होते. आता मोहन भागवत हे संघाचे विद्यमान सरसंघचालक आहेत. समाजसेवा आणि राष्ट्रहित प्रथम हे संघाचं ब्रीद आहे. याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ही प्रार्थनाही आपल्याला माहीत आहे. मात्र संघाची मूळ प्रार्थना वेगळी होती आणि ही प्रार्थना नंतर स्वीकारण्यात आली. संघाच्या १०० वर्षांच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ही प्रार्थना कुणी निवडली.

संघ विस्तारत गेला आणि प्रार्थना बदलली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतर हळू हळू संघ विस्तारु लागला. परिस्थिती आणि काळ बदलत गेल्यानंतर बदल होणं हे स्वाभाविकच असतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीतही हे घडलं. संघाच्या नियमित शाखा भरण्यास सुरुवात झाली तेव्हा मातृभूमीला नमन करण्यासाठी डॉ. हेडगेवार यांनी एक प्रार्थना तयार केली होती. हेडगेवार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी ही प्रार्थना लिहिली होती. तो असा काळ होता की नागपूरमध्ये मराठीसह हिंदी भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलली जात होती. त्यामुळे मराठीवर हिंदीचा प्रभाव होता. जे संघाच्या प्रार्थनेतही दिसून आलं. संघाच्या मराठी प्रार्थनेतही काही हिंदी शब्द होते. “नमो मातृभूमि जिथे जन्मलो मी नमो आर्यभूमि जिथे वाढलो मी, नमो धर्मभूमि. जियेच्याच कामी पड़ो देह माझा, सदा ती नमी मी.” अशी संघाची पहिली प्रार्थना होती.१९३९ पर्यंत ही प्रार्थना म्हटली जात होती. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

१९३९ च्या त्या बैठकीत काय ठराव झाला?

या प्रार्थनेत बदल करायचं ठरलं तेव्हा ती संस्कृतमध्ये असेल असा ठरावही मान्य झाला. ब्रिटिशांच्या राज्यात याच एका भाषेवर कुठलंही अतिक्रमण झालेलं नव्हतं. त्यामुळे आपली नवी प्रार्थना ही संस्कृत भाषेत असेल असं १९३९ मध्ये झालेल्या एका बैठकीत ठरलं. तसंच शाखांमध्येही मराठी आणि संस्कृत भाषांचा उपयोग होईल इंग्रजी नाही असाही ठराव करण्यात आला. नागपूरपासून ५० किमी अंतरावर असलेल्या सिंदी या ठिकाणी ही बैठक झाली होती. संघातले वरिष्ठ अधिकारी नानासाहेब तळातुळे यांच्या निवसस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. हेडगेवार, गुरुजी गोळवलकर, बाळासाहेब देवरस, अप्पाजी जोशी, विठ्ठलराव पटकी, तात्याराव तेलंग आणि कृष्णराव मोहरिल असे सदस्य उपस्थित होते. नरहरी नारायणराव भिडे हे मराठी प्रार्थनेचा संस्कृतमध्ये अनुवाद करतील हे ठरलं. ज्यानंतर नमस्ते सदा वत्सले मातृभूमे.. ही प्रार्थना तयार झाली. मागील ८५ वर्षांपासून ही प्रार्थना देशभरातल्या हजारो शाखांमध्ये रोज म्हटली जाते आहे. तिच्यात कुठलाही बदल झालेला नाही. नमस्ते सदा वत्सले ही प्रार्थना पुण्यातल्या एका संघ शिबीरात डॉ. हेडगेवार आणि गुरुजी गोळवलकर यांच्यासमोर अनंतराव काळेंनी गायली होती. त्यानंतर ही प्रार्थनाच संघाची प्रार्थना म्हणून रुढ झाली.