भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी प्रजासत्ताकदिनाच्या धर्तीवर जमिनीवर त्याचप्रमाणे हवाई सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. या शपथविधी समारंभाला शेजारील देशांमधील उच्चपदस्थ नेते आणि तीन हजारांहून अधिक निवडक निमंत्रित हजर राहणार आहेत.
रायसिना हिल्स परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून राष्ट्रपती भवनाच्या परिसरातील विविध कार्यालये सोमवारी दुपारीच म्हणजेच प्रत्यक्ष शपथविधी समारंभाच्या पाच तास अगोदर बंद करण्यात येणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या हिरवळीवर हा शपथविधी समारंभ होणार आहे.
परिसरातील कार्यालये दुपारी बंद करण्यात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांमार्फत ही कार्यालये आणि परिसर पिंजून काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता शपथविधी समारंभ होणार आहे.
भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे आकाशात गस्त घालण्यात येणार असून गगनचुंबी इमारतींवरही सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात येणार आहे. रायसिना परिसरातील सर्व रस्तेही बंद केले जाणार असून भ्रमण पथके, विमानविरोधी बंदुका आणि एनएसजीचे शार्पशूटर्सही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे निमलष्करी दल आणि दिल्ली पोलीस कमांडोही तनात करण्यात येणार असून श्वानपथके आणि बॉम्ब निकामी करणारी पथकेही समारंभाच्या ठिकाणी तैनात केली जाणार आहेत.
देशविदेशातील जवळपास तीन हजारांहून अधिक जण या शपथविधी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासावर हल्ला चढविण्यात आल्याने दिल् ली पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना अधिक सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. केवळ राष्ट्रपती भवनच नव्हे तर परदेशी नेते वास्तव्य करणाऱ्या हॉटेलमध्येही कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. नेत्यांच्या ये-जा करण्याच्या मार्गावरही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.इतकी सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात येणार असतानाही त्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत यासाठी विविध सुरक्षा यंत्रणांच्या उच्चपदस्थ बैठका राष्ट्रपती भवनात सातत्याने सुरू आहेत. सुरक्षा व्यवस्थेसाठी नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे.
राष्ट्रपती भवन बंद
नरेंद्र मोदी सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याने त्याच्या तयारीसाठी शनिवार आणि रविवारी राष्ट्रपती भवन जनतेसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
लष्कराच्या वतीने दर शनिवारी राष्ट्रपती भवनात मानवंदना दिली जाते. मात्र शपथविधी समारंभाची तयारी करण्यासाठी या वेळी हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.
राष्ट्रपती भवनाच्या हिरवळीवर मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यात येणार असून या समारंभाला सार्क देशांचे प्रमुख आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
श्रीलंका, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, मालदीव यांच्याकडून निमंत्रण स्वीकारण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयास कळविण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2014 रोजी प्रकाशित
मोदींच्या शपथविधीसाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था
भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी प्रजासत्ताकदिनाच्या धर्तीवर जमिनीवर त्याचप्रमाणे हवाई सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.

First published on: 24-05-2014 at 03:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi swearing in security tighter than r day