यादगिर (कर्नाटक) : कर्नाटकात ९ व्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने एका सरकारी निवासी शाळेतील स्वच्छतागृहात मुलाला जन्म दिल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. यादगिर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बुधवारी (२७ ऑगस्ट) ही घटना घडली. मुलीच्या वर्गमैत्रणींनी तिला प्रसूतिवेदना होत असल्याचे पाहिल्यानंतर शाळा प्रशासनाला माहिती दिली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

‘एफआयआर’नुसार १७ वर्षे आणि सात महिने वयाची ही मुलगी गर्भवती होती. नऊ महिन्यांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. सुरुवातीला प्रचंड तणावाखाली असलेल्या मुलीने घटनेची तसेच संबंधित व्यक्तीची माहिती देण्यास नकार दिला. शौचालयात असताना पोटदुखी झाली आणि तिथेच बाळाला जन्म दिल्याचे तिने तपास अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी या घटनेतील आरोपीची ओळख पटवली असून, २८ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आणि डॉक्टरांनी तिला तंदुरुस्त घोषित केल्यावर तिचे समुपदेशन केले जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

झारखंडमध्ये चार अल्पवयीन मुलांचा नदीत बुडून मृत्यू

दुमका : झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील मयूरक्षी नदीत चार अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. येथील स्थानिकांमध्ये ‘मिनी गोवा’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बापुपूर किनाऱ्यावर ही घटना घडली. १६ ते १७ वयोगटातील हे चार मित्र गुरुवारी नदीत अंघोळीसाठी गेले होते. ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दुपारी त्यांचे कपडे आणि मोबाइल किनाऱ्याजवळ सापडले, असे जामा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजित कुमार यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. शुक्रवारी पहाटे एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर काही तासांतच इतर तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शस्त्रास्त्रे, दारूगोळा तस्करीप्रकरणी एकास अटक

नवी दिल्ली : नागालँडमधून बिहारमध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा तस्करी करणाऱ्या एका आरोपीला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. मंजूर खान ऊर्फ बाबू भाई हा मुख्य आरोपी विकास कुमारचा जवळचा साथीदार आहे. विकास कुमार हा नागालँडमधून बिहारमध्ये एके-४७ रायफल्ससह प्रतिबंधित शस्त्रांची तस्करी करण्यात सक्रिय होता. एनआयएच्या तपासातून असे समोर आले आहे की, मंजूरने आपल्या साथीदारांसोबत प्रतिबंधित शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा कट रचला होता, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. तपास संस्थेने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. एनआयएने ऑगस्ट २०२४ मध्ये या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि तपासादरम्यान मंजूरची कटातील भूमिका उघडकीस आणली.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी ऊर्जित पटेल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती केली आहे. तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असणार आहे. सरकारने के. व्ही. सुब्रमण्यम यांना ३० एप्रिल २०२५ रोजी या पदावरून हटवले होते. सुब्रमण्यम यांच्या जागी पटेल यांची नियुक्ती झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळात २५ संचालक असतात. भारत हा बांगलादेश, श्रीलंका आणि भूतानसह चार देशांच्या मतदारसंघाचा भाग आहे. या नियुक्तीपूर्वी, पटेल यांनी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेत (एआयआयबी) ‘गुंतवणूक प्रचालन’चे (प्रदेश १) उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

भयानक दुर्घटना घडल्यास सर्वोच्च पद स्वीकारण्यास तयार; अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स यांचे वक्तव्य

वॉशिंग्टन : भयानक दुर्घटना घडल्यास देशाचे सर्वोच्च पद स्वीकारण्यास तयार असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स यांनी शुक्रवारी केले. तथापि, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे तारुण्य खूप चांगले आहे आणि ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असेही ते म्हणाले. ‘यूएस टुडे’ ला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांनी ७९ वर्षांचे ट्रम्प यांच्या प्रकृतीविषयीच्या चर्चा फेटाळून लावल्या. दरम्यान, सध्याच्या भूमिकेमुळे आवश्यकता भासल्यास अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी स्वत:ला तयार केले असल्याची पुस्तीदेखील त्यांनी जोडली. व्हान्स अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण उपाध्यक्ष आहेत. ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दल आणि वयाबद्दल विरोधी पक्षाने व्यक्त केलेल्या चिंतांदरम्यान व्हान्स यांनी वक्तव्य केले आहे. या महिन्याच्या प्रारंभी ट्रम्प यांनी ४१ वर्षांचे व्हान्स यांचे त्यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (एमएजीए) मोहिमेचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते.

गाझा शहरातील मानवतावादी मदतीला स्थगिती

गाझा सिटी : गाझा शहरातील मानवतावादी मदतीला स्थगिती देत त्याला युद्धक्षेत्र घोषित केल्याचे इस्रायलच्या लष्कराने शुक्रवारी सांगितले. गेल्या महिन्यात इस्रायलने सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत अन्न आणि मदत पुरवठा करण्यासाठी युद्धविराम केलेल्या शहरांपैकी हे शहर होते. गाझा शहर, देईर अल-बलाह आणि मुवासी या तीन ठिकाणी युद्धविराम लागू करण्यात आला होता. या शहरांमध्ये लाखो विस्थापित लोक आश्रय घेत आहेत. इस्रायलने आपले गाझातील आक्रमण वाढविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून, गाझा शहर ताब्यात घेण्यासाठी हजारो सैन्य तैनात केले आहे. तत्पूर्वी इस्रायलच्या लष्कराने युद्ध पुन्हा सुरू करण्याबद्दल रहिवाशांना किंवा मदत गटांना सूचित केले की नाही, याबद्दल अस्पष्टता आहे. गाझा शहर हा हमासचा बालेकिल्ला आहे. येथे मोठ्या प्रमाणात हल्ले झाल्यानंतरही अतिरेक्यांनी बोगद्यांचा वापर केला, असे इस्रायलने यापूर्वी म्हटले आहे. इस्रायलने नियोजित प्रमाणे आक्रमण केले तर येथील रुग्णालयांमधील खाटांची क्षमता निम्मी कमी होऊ शकते, असे संयुक्त राष्ट्रांनी गुरुवारी म्हटले आहे.