पीटीआय, नवी दिल्ली
लॉरेन्स बिष्णोई टोळीतील सदस्यांना देशाबाहेर पळून जाण्यास आणि पासपोर्ट मिळवण्यास मदत करण्यासाठी बनावट कागदपत्रे पुरवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आणखी एका आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हा खटला बिष्णोई टोळीने भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ (बीकेआय) या दहशतवादी संघटनेशी संगनमत करून रचलेल्या दहशतवादी कटाशी संबंधित आहे.

दिल्लीतील पटियाला हाऊस येथील ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयात शनिवारी दाखल केलेल्या पाचव्या आरोपपत्रात, तपास संस्थेने राहुल सरकारवर भारतात दहशतवादी कारवाया करण्यात टोळीतील सदस्यांना मदत केल्याचा आरोप केला आहे. सरकारसह या प्रकरणात २२ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यापैकी १८ जणांना अटक करण्यात आली आहे, तर चार जण फरार आहेत. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ४ ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता व त्याच वर्षी २६ ऑगस्ट रोजी ‘एनआयए’ने तपासाची सूत्रे हाती घेतली होती.