नवी दिल्ली : राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पावर लिफ्टर सक्षम यादव याचा एका भीषण रस्ता अपघातात रविवारी मृत्यू झाला. त्याच्यासोबत त्याच्या ४ खेळाडू मित्रांनाही या अपघातात जीव गमवावा लागला आहे. तर एक मित्र गंभीर जखमी आहे. ज्या कारमधून हे सहा जण प्रवास करीत होते त्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. यावरुन हा अपघात किती भयंकर होता ते कळते. दिल्ली जवळील अलिपूर भागातील सिंघू बॉर्डर येथे हा आपघात झाला. पहाटे पावणे पाच वाजता हा आपघात घडला.

सक्षमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला एआयआयएमएस ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने संध्याकाळी ६.३८ वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सक्षमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर अंतर्गत रक्तश्राव झाला होता.

रोहिणी जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त रजनीश गुप्ता यांनी सांगितले की, इतर मृत खेळाडूंमध्ये टिकामचंद ऊर्फ टिंका (वय २७), सौरभ (१८), योगेश (२४), हरिश रॉय (२०) यांचा समावेश आहे. तर जखमी रोहितला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली-चंदीगड महामार्गावरून जात असताना खेळाडूंची कार अतिवेगात होती. सुरुवातीला ती दुभाजकाला धडकली त्यानंतर एका लोखंडी खांबावर जाऊन ती आदळली. हे सहाही जण रोहितचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघाले होते. त्यांच्या कारमध्ये काही मद्याच्या बाटल्याही आढळून आल्या असल्याने ही ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचे प्रकरण असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.