ऐन पन्नाशीत पुनर्विवाह करण्याचा निर्णय येथील एका अरबास बऱ्यापैकी महाग पडला असून ‘शिक्षा’ म्हणून त्याच्या प्रथम पत्नीने त्याला धडा शिकविण्यासाठी चक्क बाथरूममध्ये कोंडून ठेवले..ही शिक्षा एवढी भारी ठरली की हा अरबी माणूस तेथेच अतीव मधुमेहामुळे चक्कर येऊन पडला.
या शिक्षेमुळे गलितगात्र झालेल्या या अरबाने दुबईच्या रुग्णवाहिका सेवेस दूरध्वनी करून आपण बेशुद्ध पडण्याच्या बेतात कळविले. त्यांची माणसे त्याची सुटका करण्यासाठी तेथे आलीही..मात्र, आपण आपल्या नवऱ्यास धडा शिकविण्याच्या हेतूनेच कोंडले असल्याचे सांगत त्याच्या प्रथम पत्नीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना तेथे जाण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या द्वितीय पत्नीलाही भेटण्यास तिने मज्जाव केला.
 यानंतर दुबईच्या पोलिसांनी उभयतांमध्ये सामोपचाराने तडजोड घडवून आणल्यानंतर त्याने तक्रारीचा आग्रह धरला नाही. आपण आपला जीव वाचविण्यासाठीच रुग्णवाहिकेस पाचारण केले, आपल्या पत्नीविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांना बोलाविले नव्हते, असे त्याने पोलिसांकडे स्पष्ट केले.
नंतर त्याच्या पत्नीनेही दिलगिरी व्यक्त करून आपल्या पतीला इजा पोहोचविण्याचा इरादा नसल्याचे सांगितले.