ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे भारताशी अनोखे नाते आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे बोरिस हे भारताचे जावई आहेत. बोरिस यांची घटस्फोटीत पत्नी मारिया विलर या भारतीय वंशाच्या आहेत. १९९३ साली बोरिस आणि मारिया यांचे लग्न झाले. मारिया ही प्रसिद्ध लेखक कुशवंत सिंग यांची पुतणी आहे.

२५ वर्ष संस्कार केल्यानंतर मागील वर्षी बोरिस आणि मारिया विभक्त झाले. मात्र बोरिस आपल्या सासुरवाडीला म्हणजे भारतामध्ये अनेकदा येऊन गेले आहेत. बोरिस यांनीच एकदा बोलताना आपण भारताचे जावई असल्याचे म्हटले होते. मारिया यांची आई दीप सिंग यांनी बीबीसीचे प्रसिद्ध पत्रकार चार्ल्स विलर यांच्याशी लग्न केले होते. २००८ साली या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर दीप यांनी कुशवंत सिंग यांचे धाकटे बंधू दिलजीत सिंग यांच्याशी लग्न केले. पत्नी मारिया आणि आपल्या तीन मुलांबरोबर बोरिस हे मागील वर्षी भारतामध्ये रणथंबोर अभयारण्य पाहण्यासाठी आले होते अशी माहिती कुशवंत यांचे पुत्र राहुल सिंग यांनी दिली आहे. बोरिस आणि मारिया यांनी एकूण चार मुले आहेत.

ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी आणि सत्तारूढ कंझर्वेटीव्ह पार्टीच्या नेतेपदासाठी सोमवारी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये पक्षाच्या १ लाख ६० हजार कार्यकर्त्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. मतदान प्रक्रियेदरम्यान, जॉन्सन हे आघाडीवर होते. ब्रिटनच्या संविधानानुसार बहुमत असलेल्या पक्षाचा नेताच पंतप्रधानपदी विराजमान होतो. त्यामुळेच आज बोरिस हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. कंझर्वेटीव्ह पक्षाच्या भारतीय समर्थकांशी संवाद साधताना बोरिस यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर आपले खूप चांगले संबंध असल्याचे म्हटले होते. भारतीय समर्थकांना लिहिलेल्या पत्रामध्ये, माझी मोदींबरोबर भेट झाली तेव्हा मी त्यांना भारत आणि ब्रिटन हे जगातील दोन मोठे प्रजासत्ताक देश असून त्यांनी एकत्र येऊन व्यापार आणि आर्थिक भरभराट होण्यासाठी काम करायला हवे असे सांगितल्याचे नमूद केले होते. दोन्ही देशांसमोरील प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र काम करायला हवे अशी इच्छाही बोरिस यांनी मोदींना बोलून दाखवली होती.

दरम्यान, थेरेसा मे सरकारमधील परराष्ट्र मंत्री अॅलन डंकन यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच जॉन्सन यांच्यासोबत आपण काम करू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान माजी परराष्ट्र मंत्री आणि लंडनचे महापौर राहिलेले बोरिस हे राणी एलिझाबेथ यांच्याकडून नियुक्त होणारे ब्रिटनचे १४ वे पंतप्रधान ठरणार आहेत.