तेल अवीव : ‘गाझामध्ये युद्धविरामासाठी अमेरिकेबरोबर नवे नियोजन करीत आहे. सविस्तर तपशील तयार करीत आहोत,’ असे प्रतिपादन इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी रविवारी केले. नेतान्याहू लवकरच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. नेतान्याहू यांच्या या वक्तव्यामुळे गाझा पट्टीतील संघर्ष थांबण्याबाबत आशावाद निर्माण झाला आहे.
सूत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले, की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अरब देशांसमोर संबंधित प्रस्ताव समोर ठेवला आहे. युद्धविरामासाठी २१ नवे मुद्दे आहेत. त्यानुसार तातडीने युद्धविराम लागू होणार असून, इस्रायलच्या ओलिसांना हमासने ४८ तासांत सोडावे, अशी अट आहे. इस्रायलच्या फौजा हळूहळू नंतर माघारी जातील.
गाझा पट्टीत युद्धविराम व्हावा, यासाठी नेतान्याहू यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आहे. येथे आतापर्यंत ६६ हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प-नेतान्याहू यांच्या भेटीत हा संघर्ष संपविण्यासाठी ट्रम्प नवा प्रस्ताव समोर ठेवण्याची शक्यता आहे.
युद्धविरामावर आम्ही नियोजन करीत आहोत. त्याला अंतिम रूप आलेले नाही. ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांबरोबर आम्ही काम करीत आहोत. आम्ही यामध्ये नक्की पुढे जाऊ. – बिन्यामिन नेतान्याहू, पंतप्रधान, इस्रायल