डीप स्पेस इंडस्ट्रीजने ही योजना आखली असून त्या अंतर्गत फायरफ्लाइज नावाची छोटी याने पृथ्वीनिकटच्या या लघुग्रहांकडे पाठवली जाणार आहेत, ती प्राथमिक संशोधनाचे काम करतील. ही याने पृथ्वीवरून तिकडे जातील व परत येणार नाहीत
ड्रॅगनफ्लाइज
फायरफ्लाइज यानांनी कोणत्या लघुग्रहांवर कोणती खनिजे व धातू आहेत हे शोधल्यानंतर ड्रॅगनफ्लाइज ही जरा मोठी याने मोहिमेवर निघतील व ती ५० ते १०० पौंड वजनाचे नमुने पृथ्वीवर परत घेऊन येतील. साधारण २०१६ पर्यंत हे शक्य आहे. तेथे प्लॅटिनमसह अनेक अमूल्य धातू आहेत
लघुग्रहांवर खाणकाम
आपल्या पृथ्वीभोवती अनेक लघुग्रह आहेत त्यातील काही जवळून जातात, तेव्हा पृथ्वीवर आघात होण्याचा धोका असतो. पण आता या लघुग्रहांचा वापर करून उपयुक्त खनिजे व धातू गोळा करण्याची वैज्ञानिकांची योजना आहे. त्यासाठी इ.स. २०१५ पर्यंत डीप स्पेस कंपनीच्या वतीने खास यान पाठवले जाणार आहे. लघुग्रह हे पृथ्वीपासून ५ कोटी किलोमीटर अंतरावर अंतराळात तरंगणारे भलेमोठे दगड असतात.
खाणकाम कशासाठी?
पुढील काळात मानवाला मंगळावर जाण्याची मोठी जिद्द आहे, तिथे यान पाठवायचे तर इंधनाचा खर्च मोठय़ा प्रमाणात होतो. त्यामुळे अंतराळातील या लघुग्रहांवर खाणकाम करून धातू, पाणी व संयुगे यांचा शोध घ्यायचा व त्यातून तेथेच इंधन तयार करून ते अंतराळयानांसाठी वापरायचे असा वैज्ञानिकांचा इरादा आहे.
प्लॅनेटरी रिसोर्सेसचाही प्रकल्प
चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरून, गुगलचे कार्यकारी लॅरी पेज व एरिक श्मिडट यांची गुंतवणूक असलेल्या प्लॅनेटरी रिसोर्सेस या कंपनीचाही लघुग्रहांवर जाऊन खाणकाम करण्याचा इरादा आहे.
मंगळासारख्या लांबच्या मोहिमांसाठी अंतराळातच इंधन बनवणार
अनेकदा उपग्रहांचे किंवा अंतराळयानांचे इंधन संपल्याने ते निकामी होतात त्यांना अंतराळातच इंधन भरून पुन्हा वापरात आणता येईल. उपग्रहांचे असे आयुष्य एक महिन्याने किंवा अधिक वाढले तरी उपग्रह कंपनीला त्यामुळे ५० ते ८० लाख अमेरिकी डॉलर इतका फायदा होईल.मंगळासारख्या लांबच्या मोहिमातही त्याचा उपयोग होईल.
अंतराळात इंधन तयार करण्याची कल्पना नासाच्या मंगळमोहिमांसाठी पूरक आहे, कारण एखादे यान अंतराळात पाठवण्यासाठी एका पौंडामागे पाच हजार ते दहा हजार अमेरिकी डॉलर इतका खर्च येतो, जर नासाने केवळ अंतराळयानाचे हार्डवेअर तिथे नेले व अंतराळातून ते पाठवले तर मंगळावर जाण्यासाठी इंधन कमी लागेल व ते स्वस्तात मिळेल. मंगळावर पाठवण्याच्या यानात ९० टक्के वजन हे इंधनाचेच असणार आहे.
डेव्हीड गम्प, मुख्य कार्यकारी अधिकारी ‘डीप स्पेस’