वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन सध्या चांगली कामगिरी करत असून भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याची कामगिरी न्यूझीलंडसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा आशावाद न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी व्यक्त केला.
यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वाधिक १७ बळी फर्ग्युसनने मिळवले आहेत. मात्र मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्याला मुकला होता. स्टेड म्हणाले, ‘‘फर्ग्युसनने पुढील सामन्यात खेळावे, हीच माझी अपेक्षा आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला ४८ तासांचा अवधी लागणार असला तरी तो चांगल्या स्थितीत दिसत आहे. पहिल्याच विश्वचषकात खेळणाऱ्या फर्ग्युसनने आमच्या अपेक्षेपेक्षाही चांगली कामगिरी केली आहे. त्याची कामगिरी आमच्यासाठी मोलाची ठरणार आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांवर सातत्याने दबाव आणला आहे. भारताविरुद्धही तो चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे.’’
बुमराच्या गोलंदाजीवर खेळणे अशक्य!
मँचेस्टर : या क्षणी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचा वेगवान मारा हाताळणे कोणत्याही फलंदाजाला शक्य नाही. त्यामुळे उपांत्य फेरीत बुमराचा सामना करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरीने व्यक्त केले. ‘‘भारताविरुद्ध मोठी धावसंख्या कशी उभारता येऊ शकेल, हे इंग्लंडने एजबॅस्टन येथील सामन्यात दाखवून दिले. इंग्लंडने बुमराची गोलंदाजी सावधपणे खेळून काढली. कारण त्याच्या गोलंदाजीवर धावा काढणे या क्षणी तरी शक्य दिसत नाही; पण इंग्लंडने अन्य सर्व गोलंदाजांना लक्ष्य केले. न्यूझीलंडनेही त्याच रणनीतीनुसार आक्रमक धोरण अवलंबणे गरजेचे आहे,’’ असेही व्हेटोरीने सांगितले.
