सलग दोन सामन्यांत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवल्यानंतर विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज असलेल्या न्यूझीलंडच्या संघापुढे शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यात न्यूझीलंडला नमवून अफगाणिस्तान यंदाच्या विश्वचषकातील पहिला विजय साकारणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखाळी खेळणाऱ्या न्यूझीलंडने पहिल्या दोन लढतींमध्ये अनुक्रमे श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत केले. श्रीलंकेवर त्यांनी सहज विजय मिळवला असला तरी बांगलादेशने त्यांना विजयासाठी चांगलेच झुंजवले. न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुन्रो भन्नाट लयीत असून अनुभवी रॉस टेलरनेसुद्धा गेल्या लढतीत अर्धशतक झळकावले आहे. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना खेळपट्टीवर टिकण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजीत मॅट हेन्रीने दोन सामन्यांतून सात बळी पटकावल्यामुळे ट्रेंट बोल्टच्या भेदकतेची अद्याप न्यूझीलंडला गरजच भासलेली नाही.

दुसरीकडे अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यातही श्रीलंकेविरुद्ध त्यांना २०१ धावांचा पाठलाग करणेही जमले नाही. त्यातच आता मोहम्मद शहझादही दुखापतीमुळे उर्वरित विश्वचषकाला मुकणार असल्यामुळे अफगाणिस्तानच्या चिंतेत भर पडली आहे. रहमत शाह आणि नजिबुल्ला झादरान यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला या स्पर्धेत छाप पाडता आलेली नाही. त्याशिवाय फिरकीपटू रशीद खान व मुजीब उर रहमान यांनासुद्धा लौकिकाला साजेशी कामगिरी जमलेली नाही.