पीटीआय, नवी दिल्ली, मंगळुरू, श्रीनगर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी कर्नाटक, बिहार, झारखंड आणि जम्मू-काश्मीर अशा विविध भागांमध्ये छापे टाकले. दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा केला जात असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली.कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील १६ ठिकाणी एकाच वेळी छापे घातले. छापे टाकण्यात आलेल्या सर्व जागा सध्या बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या मूलतत्त्ववादी संघटनेशी संबंधित आहेत.दहशतवादाशी संबंधित कृत्यांसाठी आखाती देशातून निधी पुरवठा होत असल्याची एनआयएला माहिती मिळाल्यानंतर छापे टाकण्यात येत आहेत.

झारखंडमध्ये एनआयए आणि राज्य पोलिसांनी संयुक्तरित्या हाती घेतलेल्या शोधमोहिमेमध्ये शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. झारखंडमधील पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया (पीएलएफआय) या माओवादी संघटनेला अर्थपुरवठा केला जात असल्याच्या प्रकरणात गेले दोन दिवस एनआयए आणि पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली होती. एनआयएच्या कोठडीत असलेल्या दिनेश गोपेने दिलेल्या माहितीनंतर खुंटी, गुमला आणि सिमडेगा जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये शस्त्रे आणि दारूगोळा सापडला. त्यामध्ये ६२.३ किलो जिलेटिन आणि जवळपास आठशे गोळय़ांचा समावेश आहे. मागील आठवडय़ातील कारवाईमध्ये जवळपास दोन हजार गोळय़ा आणि २५ लाख रोख रक्कम सापडली होती.

एनआयएने काश्मीर खोऱ्यात तीन ठिकाणी छापे टाकले. एका नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली. श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यांमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये छापील साहित्य आणि अनेक डिजिटल उपकरणे ताब्यात घेण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nia raids across the country on suspicion of financing terrorist activities amy