विश्वचषकातील बहुतांश सामन्यांत विजयाच्या जवळ जाऊनही पराभूत होण्याचे आम्ही विविध मार्ग शोधले. त्यामुळे आता विश्वचषकानंतर भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत आम्ही गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याच्या उद्देशाने खेळू, अशी प्रतिक्रिया वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरनने व्यक्त केली.
पूरनने साकारलेल्या ११८ धावांच्या तुफानी खेळीनंतरही विंडीजला सोमवारी श्रीलंकेविरुद्ध २३ धावांनी पराभव पत्करावा लागला. ‘‘यंदाचा विश्वचषक आमच्यासाठी निराशाजनक ठरला; परंतु खेळाडू म्हणून या स्पर्धेने मला फार काही शिकवले आहे. आमच्या संघातील जवळपास सहा ते सात खेळाडू हे २५-३० या वयोगटातील असल्यामुळे भविष्याच्या दृष्टीने विंडीजसाठी ही जमेची बाजू आहे. आमच्या संघात माझ्याव्यतिरिक्त शिम्रॉन हेटमायर, शाय होप आणि फॅबिअन अॅलन यांसारखे युवा खेळाडू आहेत. त्यामुळे भारताविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेत आम्ही नव्या उमेदीने मैदानावर उतरू,’’ असे पूरन म्हणाला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ऑगस्ट महिन्यात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका रंगणार असून उभय संघांत दोन कसोटी सामनेदेखील खेळवले जाणार आहेत.
‘‘ब्रायन लाराशी माझी तुलना करण्यात येत असली तरी त्यांच्यासारख्या महान खेळाडूला पाहूनच मी क्रिकेटकडे वळल्यामुळे लारा यांच्याशी माझी तुलना करणे चुकीचे असून विंडीजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला मिळाले, हेच माझे भाग्य आहे,’’ असेही पूरनने सांगितले. त्याशिवाय विश्वचषकाची अंतिम फेरी भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघांमध्ये व्हावी, अशी इच्छाही पूरनने व्यक्त केली.