गुजरातमध्ये गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलींवेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणालाही ‘जा आणि लोकांना गोळ्या घाला’, असा आदेश कधीच दिला नव्हता, असा युक्तिवाद या प्रकरणाची चौकशी करणाऱया विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) वकिलांनी केलाय. गुजरातमध्ये त्यावेळी उसळलेल्या दंगलींप्रकरणी एसआयटीने आपल्या अहवालात मोदी यांना क्लिनचीट दिली होती. झाकिया जाफ्री यांनी एसआयटीच्या अहवालाविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. 
जाफ्री यांच्या याचिकेवरून एसआयटीचे वकील आर. एस. जामोर यांनी त्यांच्यावर टीका केली. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि अन्य काही जणांनी मोदी यांना लक्ष्य करण्यासाठीच ही याचिका दाखल केलीये. मोदींनी कधीही जा आणि लोकांना गोळ्या घाला, असे म्हटले नव्हते, असे जामोर यांनी म्हटले आहे.
न्यायालयातील युक्तिवादामध्ये जामोर यांनी तिस्ता सेटलवाड यांच्यावरही आरोप केले. सेटलवाड या अघटीत कल्पना रचणाऱया कथाकार आहेत. त्यांच्या या स्वभावातूनच त्यांनी मोदींवर आरोप केले आहेत. दंगलींवेळी मोदींनी उच्चस्तरिय पोलिस अधिकाऱयांना दंगलखोरांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले होते, हा सेटलवाड यांचा आरोप त्यांचा कल्पनाविलास असल्याचे मत जामोर यांनी व्यक्त केले. यासंदर्भात कोणताही पुरावा एसआयटीला मिळालेला नाही, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No evidence that narendra modi incited rioters or pressured police says sit