दिवाळीच्या वेळी भारतात फटाके उडवले जातात त्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते त्याचा फटका माणसाबरोबरच प्राणी-पक्षी यांनाही बसत असतो, पण आता चिनी नववर्षांनिमित्त तेथे धूरमुक्त व प्रदूषणमुक्त फटाके शोधून काढण्यात आले आहेत.
चीनमध्ये या महिन्याच्या अखेरीस नवे वर्ष साजरे होत आहे. त्यात हे धूरमुक्त फटाके वापरले जाणार आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या दिवाळीत चीनने भारतातील फटाक्यांची ३० टक्के बाजारपेठ काबीज केली होती.
वँग शिंगमिंग या तेल कंपनीच्या कर्मचाऱ्याने हे धूरमुक्त फटाके तयार केले आहेत. त्यात लोकांना प्रदूषणापासून वाचता येणार आहे, असे शिनहुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
माझे संशोधन हे स्फोटके किंवा विजेशी संबंधित नाही असे वँग यांनी सांगितले व त्यांच्या शोधाला जुलैत पेटंट मिळाले आहे. या फटाक्यात बंदिस्त पोकळीचा वापर केला असून त्यात हवा भरली जाऊ शकते. उपयोगकर्त्यांना बटन दाबून त्यात छोटय़ाशा छिद्रात हवा भरता येते. यात हवा संप्रेषित होते व ती बाहेर पडताना स्फोटासारखा आवाज होतो, असे वँग यांचे म्हणणे आहे.
नेहमीच्या फटाक्यांपेक्षा सुंदर असे हे फटाके आहेत, लोकांना हवे असेल तर हे फटाके पाणी, बाष्पाचे तुषार किंवा सुवास बाहेर टाकू शकतात. चीनमध्ये नववर्षदिनी फटाक्यांची आतषबाजी करण्यास परवानगी आहे. तेथे वसंतोत्सव पंधरा दिवस साजरा केला जातो.
चिनी लोक पारंपरिक पद्धतीने फटाके लावतात. चिनी चांद्र वर्ष हे अंधश्रद्धेवर आधारित आहे. फटाक्यांच्या आवाजाने पापात्मे पळून जातात व नशीब बदलते अशी त्यांची समजूत आहे. नेहमीच्या फटाक्यात माती, सल्फर डायॉक्साईड यांचा समावेश असतो. संशोधक वँग यांच्या मते त्यांचे फटाके सुरक्षित व पर्यावरणस्नेही असे आहेत.
अजून तरी या फटाक्यांचे व्यावसायिक उत्पादन सुरू झालेले नाही. ते प्लास्टिकपासून तयार करतात. एका फटाक्याची किंमत सध्या १५० युआन म्हणजे २५ अमेरिकी डॉलर आहे.
विक्री किंमत त्यापेक्षा जास्त आहे. पण हे फटाके पुन्हा वापरता येतात. काही वेळा सण साजरा करण्याच्या पद्धतींचा पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. वँग यांचे संशोधन मोठय़ा प्रमाणावर उत्पादन केल्यास धूर व इतर प्रदूषणापासून बचाव होतो असे इन्स्टिटय़ूट फॉर अर्बन अँड एनव्हरॉनमेंटल स्टडीज या संस्थेचे संशोधक चेन यिंग यांनी सांगितले.

’पर्यावरणस्नेही फटाके
’रसायनांचा वापर नाही
’प्लास्टिकचा वापर
’निर्वात पोकळीचा आवाजासाठी वापर
’किंमत २५ डॉलर
’फटाक्यांचा फेरवापर शक्य