भारताच्या अ‍ॅस्ट्रोसॅट या अवकाश निरीक्षण वेधशाळेने पहिले छायाचित्र पाठवले असून ते भारतीय अवकाश संस्था म्हणजे इस्रोने ट्विटरवर प्रसारित केले आहे. बहुतरंगलांबीच्या अ‍ॅस्ट्रोसॅट वेधशाळेने टिपलेले हे छायाचित्र अतिदीप्त नवताऱ्याच्या (सुपरनोव्हा) अवशेषांचे आहे. त्यात खेकडय़ाच्या आकाराचा तेजोमेघ (नेब्यूला) दिसत आहे. हे छायाचित्र शुक्रवारी घेण्यात आले असून तो तेजोमेघ हा प्रखर क्ष किरण सोडणारा आहे. इस्रोच्या ब्लॉग पोस्टवर म्हटले आहे की, हा तेजोमेघ अ‍ॅस्ट्रोसॅटला प्रथम कक्षेतून दिसला नाही, कारण ही वेधशाळा त्यावेळी दक्षिण अटलांटिक भागातून जात असावी. साउथ अ‍ॅटलांटिक अ‍ॅनोमली (एसएए) म्हणजे अवकाशातील बम्र्युडा ट्रँगल (जेथे वस्तू दिसत नाहीत असा भाग) असून त्यामुळे खगोलशास्त्रीय निरीक्षणात अडथळे येतात. इलेक्ट्रॉनिक प्रणाली व संगणक, अवकाशयानातील भाग पुरेशा क्षमतेने काम करीत नाहीत. अगोदर अ‍ॅस्ट्रोसॅट वेधशाळा या भागातून जात असताना सर्व उपकरणे बंद करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या कक्षेतून खेकडय़ाच्या आकाराचा तेजोमेघ टिपता आला नाही कारण तो वेधशाळेच्या दृष्टीपथात आला असला तरी माहितीमध्ये अवकाशातील बम्र्युडा ट्रँगलमुळे फरक पडला असावा. त्यानंतर आम्ही त्याचा विचार केला, असे का घडत असावे याची कारणे शोधली, उपग्रहात काही बिघाड असल्याचे वाटले, पण सीझेडटी हा कॅमेरा व्यवस्थित काम करीत होता. त्यामुळे उपकरणांची काही चूक आहे असे म्हणणे मूर्खपणाचे होते. ९ ऑक्टोबरला आम्ही तो तेजोमेघ पुन्हा पाहिला व बंगळुरू येथील नियंत्रण केंद्रातून व पुण्यातील आयुकात असलेल्या पेलोड संचालन केंद्रातूनही तो दिसला. आता जीआरएस १९१५+१०५ सिग्नस एक्स १ व सिग्नस एक्स ३ या कृष्णविवरांच्या उगमस्थानांचा नोव्हेंबरमध्ये वेध घेतला जाणार आहे. इस्रोने म्हटले आहे की, सीझेटी, एलएएक्सपीसी व एसएक्सटी ही क्ष किरण उपकरणे अवकाशीय वस्तूंचा अभ्यास करण्यास सज्ज आहेत. भारताने २८ सप्टेंबरला अ‍ॅस्ट्रोसॅट ही वेधशाळा अवकाशात सोडली होती.
क्रॅब नेब्यूला
हा खेकडय़ाच्या आकाराचा तेजोमेघ असून तो १० प्रकाशवष्रे व्यासाचा आहे व सेकंदाला १५०० किलोमीटरने प्रसरण पावत आहे. त्याची रचना वैज्ञानिकांना कोडय़ात टाकणारी असून तो साध्या तेजोमेघासारखा नसून गुंतागुंतीची वेटोळी त्यात आहेत, ती वेटोळीही वेगाने प्रसरण पावत आहेत.
अवकाशातील बम्र्युडा ट्रँगल
अवकाशात साऊथ अ‍ॅटलांटिक अनोमली नावाचा जो भाग आहे तो बम्र्युडा ट्रँगलसारखा मानला जातो तो पृथ्वीपासून १००० ते ६००० किलोमीटर उंचीवरील असा प्रारणांचा पट्टा आहे तेथे सौर प्रारणे अडकलेली आहेत. एखादे अवकाशयान किंवा अवकाश स्थानक या भागात गेले की, त्यावरील यंत्रे किंवा लॅपटॉप बंद पडतात असे सांगितले जाते. प्रखर प्रारणांमुळे या भागात दृश्यभ्रम होऊन अवकाशस्थ वस्तू दिसतही नाहीत असे म्हटले जाते. त्याचा शोध १९५० मध्ये लागला. या साऊथ अ‍ॅटलांटिक अ‍ॅनोमली (एसएए) या भागात व्हॅन अलेन प्रारण पट्टा असून तेथील भारित कण पृथ्वीच्या जवळ येतात.

पृथ्वीवरील
बम्र्युडा ट्रँगल
पृथ्वीवरील बम्र्युडा ट्रँगल हा उत्तर अ‍ॅटलांटिक महासागराचा पश्चिमेकडचा भाग आहे. तेथे विमाने व जहाजे बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येते ते एक गूढ आहे, पण अमेरिकी नौदलाच्या मते हा असा काही गूढ त्रिकोण अस्तित्वात नाही. यूएस बोर्ड ऑन जिऑग्राफिक नेम्स या संस्थेने त्याला मान्यता दिलेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Observatory success to capture aestroset photo