Israel Hamas War Updates in Marathi : गेल्या महिन्याभरापासून इस्रायल संरक्षण दलाने गाझाला लक्ष्य केलं आहे. सातत्याने हल्ले चढवत हमासच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. तसंच, गेल्या १६ वर्षांत पहिल्यांदा हमासने गाझातील नियंत्रण गमावलं असल्याचं इस्रायलकडून काल (१४ नोव्हेंबर) सांगण्यात आलं होतं. तर, आता इस्रायलने गाझातील अल शिफा रुग्णालयाला टार्गेट केलं असून येथील विशिष्ट जागेवर ऑपरेशन राबवलं जात आहे. तसंच, हमासला आत्मसमर्पण करण्याचेही आवाहन इस्रायलकडून करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येत्या काही तासांत अल शिफा रुग्णालयावर हल्ला करण्यात येणार आहे, असं एनक्लेव्हमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर तासाभरातच आयडीएफने हमासला आत्मसमर्पण करण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती गाझा आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.

हेही वाचा >> रुग्णांना वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्येच राहिलेल्या डॉक्टरचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू

गेल्या दोन दिवसांपासून इस्रायलने गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयाला लक्ष्य केलं आहे. रुग्णालयात सर्वच वैद्यकीय सुविधांची वानवा निर्माण झाली असून रुग्णांचा जीव धोक्यात आलेला आहे. तर दुसरीकडे इस्रालयाने या रुग्णालयावर हल्ले सुरूच ठेवले आहेत. या रुग्णालयावरील हल्ल्यांना हमासने इस्रायल आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना जबाबदार धरल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. तसंच, पॅलेस्टाईन आरोग्यमंत्रालयानेही इस्रायलाच जबाबदार धरले आहे. दरम्यान, अल शिफा हे रुग्णालय आता धोक्याचे केंद्र बनले असल्याचंही सांगण्यात येतंय.

गाझा पट्टीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या ऑपरेशनसाठी ट्रकसाठी २४ हजार लिटर (६३४० गॅलन) डिझेल इंधन वापरण्यास इस्रायलने परवानगी दिली आहे, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे. इस्रायलने हमासविरोधात युद्ध पुकारल्यामुळे गाझामधील पॅलेस्टिनींना अन्न, पाणी आणि औषधे पोहोचवण्याच्या प्रयत्नांना इंधनाच्या तीव्र कमतरतेमुळे अडथळा निर्माण झाला आहे.

हेही वाचा >> हमास दहशतवादी संघटना आहे की नाही? ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करत इंग्लंडचे नवे गृहमंत्री म्हणाले, “मी…”

इस्रालयचे युद्ध नागरिकांशी नाही

दरम्यान, गाझा पट्टीवर नरसंहार सुरू असतानाही हे युद्ध गाझातील नागरिकांविरोधात नसून हमासविरोधात असल्याचं इस्रालयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ” हमासद्वारे मानवी ढाल म्हणून वापरल्या जाणार्‍या नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरता आयडीएफ दलांमध्ये वैद्यकीय संघ आणि अरबी भाषिकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांनी या जटिल आणि संवेदनशील वातावरणासाठी तयार होण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण घेतले आहे”, असे इस्रायल सैन्याने म्हटले आहे. तसंच, रुग्णालयातील हमासच्या दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, असा इशाराही आयडीएफकडून देण्यात आला आहे.

“हमासला पराभूत करण्यासाठी आणि आमच्या ओलीसांना सोडवण्यासाठी IDF गाझामध्ये ग्राउंड ऑपरेशन करत आहे. इस्रायलचे हमासशी युद्ध चालू आहे, गाझामधील नागरिकांशी नाही,” असं इस्रायलने X च्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अल शिफा हे गाझा शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. मागील आठवड्यात इस्रायली सैन्याने केलेल्या प्राणघातक नाकाबंदीनंतर ७२ तासांहून अधिक काळ रुग्णालयाचा जगापासून संपर्क तुटला होता. रुग्णालयाच्या गेटसमोर रणगाडे लावण्यात आले होते. हे रुग्णालय हमासच्या भूमिगत मुख्यालयाचा भाग असलेल्या बोगद्यांच्या जाळ्यावर उभारलं आहे, असा दावा इस्रायलने केला आहे. त्यामुळे इस्रायलकडून हे रुग्णालय लक्ष्य केलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our war is not against civilians hamas must surrender now israeli army warns sgk