केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे. मात्र, आता या काळात दुर्गम भागात तैनात असलेल्या भारतीय लष्करातील जवानांना त्यांच्याकडील पाचशे व हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बराच खटाटोप करावा लागत असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द होणार असल्याचे जाहीर केले होते. या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सरकारने ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली होती.

यावेळी नायक महेंद्र सिंग यांच्यासारखे अनेक जवान दुर्गम भागात तैनात होते. ज्यावेळी मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली तेव्हा नायक महेंद्र सिंग हे सियाचीनमध्ये कार्यरत होते. यावेळी त्यांच्या पाकिटात तब्बल सहा हजार रूपये होते. मात्र, ही रक्कम पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात होती. मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली तेव्हा सियाचीनमधील खराब वातावरणामुळे याठिकाणी रेडिओचा सिग्नलही येत नव्हता. अखेर काही दिवसांनी वातावरण सुधारल्यानंतर महेंद्र सिंग यांना सरकारच्या या निर्णयाबद्दल कळले. तत्पूर्वी महेंद्र सिंग यांनी नोव्हेंबर महिन्यात सुट्टीसाठी अर्ज केला होता. अखेर या महिन्यात त्यांना दहा दिवसांची सुट्टी मिळाली. तेव्हा महेंद्र सिंग सर्वप्रथम राजस्थानमधील आपल्या घरी गेले. त्यानंतर त्यांनी जुन्या नोटा बदलण्यासाठी दिल्लीतील रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात धाव घेतली. आपल्याला ३१ मार्चपर्यंत जुन्या नोटा बदलता येतील, असा त्यांचा समज होता. मात्र, दरम्यानच्या काळात सरकारने या नियमात बदल करून फक्त अनिवासी भारतीयांसाठीच (एनआरआय) हा पर्याय खुला ठेवल्याचे महेंद्र सिंग यांना माहिती नव्हते. मला या निर्णयाबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यामुळे मी हजार रूपये खर्च करून याठिकाणी आलो. मात्र, आता रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून घेण्यास नकार दिला आहे. मी दरम्यानच्या काळात सियाचीनमध्ये तैनात होतो हे सांगूनही रिझर्व्ह बँकेचे अधिकारी ऐकायला तयार नाहीत, अशी व्यथा महेंद्र सिंग यांनी मांडली.

असाच काहीसा प्रकार सीआरपीएफच्या पंकज सिंग आणि राजेश या जवानांच्याबाबतीत घडला आहे. पंकज सिंग हे नोटाबंदीच्या काळात नक्षलग्रस्त भागातील झारखंडच्या लष्करी मुख्यालयात तैनात होते. यावेळी त्यांच्याकडे १९ हजार रूपयांच्या जुन्या नोटा होत्या. माझी पोस्टिंग जंगलात होती. याठिकाणी फोन आणि रेडिओ संपर्कासाठीही रेंज नव्हती. आम्हाला अन्नधान्यदेखील हेलिकॉप्टरच्या मदतीने पुरविले जात असे. त्यामुळे याठिकाणी बँक असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आम्हाला या निर्णयाबद्दल माहिती देणारी कोणतीही व्यवस्था नव्हती. नोटाबंदीबद्दल समजले असते तरी आम्हाला नोटा बदलण्यासाठी सुट्टी मिळाली असती का, असे पंकज सिंग यांनी म्हटले. तर सीमा सुरक्षा दलाच्या राजेश यांनाही अशाचप्रकारच्या अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. राजेश कोईम्बतूर येथे प्रशिक्षण घेत असताना त्यांच्या पत्नीचा दोनवेळा गर्भपात झाला. मात्र, ही गोष्ट सांगूनही रिझर्व्ह बँकेचे अधिकारी ऐकायला तयार नाहीत. सरकार आमच्यासाठी विशेष उपाययोजना का करत नाही? लष्करी कार्यासाठी तैनात असल्याचे पुरावे देणाऱ्यांनाही यामधून सूट का दिली जात नाही?, असा सवाल राजेश यांनी उपस्थित केला. एनआरआय लोक लाखांमध्ये व्यवहार करतात. त्यामुळे दहा-वीस हजार रूपये गमावले तर त्यांना फरक पडत नाही. मात्र, आमचे वेतनच ३० हजारांपेक्षा कमी आहे. त्यामुळे मी प्रशिक्षणाच्या काळात कमावलेले नऊ हजार आता वाया जाणार असल्याचे राजेश यांनी सांगितले.