Maha Kumbh 2025 Over 100 devotees saved after heart attacks : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्याला जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या भाविकांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक अशी सर्व खबरदारी घेतली जात आहे. महाकुंभ मेळ्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या १०० हून अधिक भाविकांचा जीव वाचवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तर १८३ गंभीर आरोग्याविषयी समस्या आलेल्या भाविकांना आयसीयूमध्ये उपचार मिळाले आणि ५८० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याव्यतिरिक्त १,७०,७२७ ब्लड टेस्ट करण्यात आल्या आहेत आणि १,००,९९८ लोकांनी ओपीडी सेवांचा लाभ घेतला आहे, असेही अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले, महाकुंभ येथील केंद्रीय रुग्णालय लाखो भाविकांची सुरक्षा आणि आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवत आहे असेही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

महाकुंभ मेडिकल व्यवस्थेचे नोडल ऑफिसर डॉ. गौरव दुबे यांनी सांगितलं की देशभरातलील तसेच जगभरातील भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली जात आहे.

उपचार घेतलेल्या रुग्णांबद्दल बोलताना दुबे म्हणाले की, मध्य प्रदेशातील दोन भाविकांना छातीत दुखू लागले त्यानंतर त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोघांनांही आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, त्यांना काही काळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आले, तसेच त्यांना योग्य उपचार देण्यात आले. सध्या ते पूर्णपणे निरोगी आहेत . दुबे यांनी सांगितले की दोन्ही रुग्णांची इसीजी करण्यात आली, त्यांना मिळलेल्या प्रभावी उपचारामुळे ते लवकर बरे झाले. इतर रुग्णांमध्ये फुलापूर येथील हनुमानगंजचे रहिवासी १०५ वर्षीय बाबा राम जाने दास यांच्या पोटदुखीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

जनरल मेडिसीन, डेंटल सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, स्त्रीरोग, बालरोग आणि बालकांच्या आजारांसंबंधी तज्ञांसह इतर अनेक तज्ञ डॉक्टरांची एक टीम मध्यवर्ती रुग्णालयात सेवा देत आहे. तसेच गंभीर प्रकरणांसाठी रुग्णालयात १० खाटांचे आयसीयू उभारण्यात आले आहे. रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 100 devotees saved after heart attacks at maha kumbh 183 critical patients got icu care marathi news rak