Indian Prisoners in Foreign Jails: भारतीय स्थलांतरितांना अमेरिकेने हातात बेड्या घालून पुन्हा भारतात पाठविल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली. यानंतर शुक्रवारी लोकसभेत विदेशातील कारागृहांमध्ये असलेल्या भारतीय कैद्यांची माहिती देण्यात आली. परराष्ट्र राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंह यांनी लोकसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, विदेशातील तुरुंगात १०,१५२ कैदी आहेत. यामध्ये न्यायालयीन कैद्यांचाही समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदेशातील तुरुंगात खटला सुरू असलेले आणि दोषसिद्धी झालेल्या कैद्यांची आकडेवारी लोकसभेत जाहीर करण्यात आली. सौदी अरेबिया, कुवैत, यूएई, कतार, नेपाळ, पाकिस्तान, यूएस, श्रीलंका, स्पेन, रशिया, इस्रायल, चीन, बांगलादेश आणि अर्जेंटिना यासह ८६ देशांमध्ये किती कैदी आहेत, याची माहिती समोर आली आहे. सौदी अरेबियातील तुरुंगात २,६३३ तर संयुक्त अरब अमिरातीच्या तुरुंगात २,५१८ कैदी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

नेपाळच्या तुरुंगात १,३१७ भारतीय नागरिक आहेत. तर पाकिस्तान आणि श्रीलंकेने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या तुरुंगात अनुक्रमे २६६ आणि ९८ कैदी आहेत. राज्यमंत्री सिंह यांनी सांगितले की, न्यायालयीन कैदी आणि शिक्षा भोगत असलेले असे मिळून १०,१५२ कैदी ८६ देशांच्या तुरुंगात आहेत.

कतार येथे फिफा विश्वचषक झाल्यानंतर केरळ येथील बहुसंख्या नागरिक तुरुंगात डांबले गेले आहेत, सरकार याबाबत अवगत आहे का? असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्र्यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारी कतारच्या तुरुंगात ६११ भारतीय कैदी आहेत. तथापि, गोपनीयतेचा कायदा असल्यामुळे संबंधित कैद्यांनी संमती दिल्याशिवाय कतार सरकार त्यांची माहिती उघड करू शकत नाही. त्यामुळे कतारमधील भारतातील राज्यांनुसार किती कैदी आहेत, याची आकडेवारी मिळू शकलेली नाही.

राज्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात असेही म्हटले की, विदेशातील तुरुंगात असलेल्या भारतीय कैद्यांना सहकार्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. विदेशात एखाद्या भारतीय नागरिकाला अटक केल्यानंतर त्याची माहिती तात्काळ भारतीय दूतावासाला देण्यात येते. यानंतर परराष्ट्र कार्यालयातील अधिकारी तात्काळ कारागृहाशी संपर्क साधून अटक केलेल्या भारतीय नागरिकाला मदत पुरवितात. त्याच्या अटकेचे तथ्य पडताळून त्याला कॉन्सुलर ॲक्सेस दिला जातो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 10000 indian prisoners lodged in foreign jails at present says government kvg