पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यकाळातही पाकिस्तानी लष्कर देशाच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणांवर वर्चस्व कायम टिकवून आहे असे अमेरिकेन काँग्रेशनल अहवालात म्हटले आहे. काँग्रेशनल रिसर्च सर्व्हीसने अमेरिकन प्रतिनिधींसाठी हा अहवाल तयार केला आहे. निवडणूक जिंकण्याआधी इम्रान खान यांच्याकडे सरकार चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता.
नवाझ शरीफ यांचे सरकार हटवण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेने देशांतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याचा दावा या अहवालातून करण्यात आला आहे. इम्रान खान यांनी देशवासियांना नया पाकिस्तानचे स्वप्न दाखवले. भ्रष्टाचार मुक्त कारभारासह कल्याणकारी राज्याची निर्मिती चांगले आरोग्य, शिक्षणाचे आश्वासन दाखवले होते. पण सध्या पाकिस्तान आर्थिक संकटात सापडल्याचे अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणावर अजूनही पाकिस्तानी लष्कराचे वर्चस्व असल्याचे मत विश्लेषकांनी नोंदवले आहे. सीआरएस हा अमेरिकन काँग्रेसचा स्वतंत्र विभाग आहे. पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर असले तरी तिथे सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणांमध्ये लष्कर आणि आयएसआयची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे. इम्रान खान सरकारचा चेहरा असले तरी पडद्यमागून लष्कर सूत्रे हलवत असल्याचा आरोप नेहमीच केला जातो.