आठ महिन्यांपूर्वी कराचीमधून ताब्यात घेण्यात आलेल्या १४७ भारतीय मच्छिमारांची पाकिस्तानने अखेर सुटका केली आहे. पाकिस्तानच्या हद्दीतील पाण्यात मासेमारी करण्यात येत असल्याच्या आरोपावरुन या मच्छिमारांना ताब्यात घेण्यात आले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते महम्मद फैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जानेवारीपर्यंत पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारताच्या ३०० मच्छिमारांची सुटका करण्यात येईल. त्यातील १४७ जणांची पहिल्या टप्प्यात सुटका करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार हे १४७ मच्छिमार कराचीहून लाहोरला येण्यासाठी निघाले आहेत. लाहोरहून वाघा बॉर्डर ओलांडून हे मच्छिमार भारतात येतील असे सांगण्यात आले आहे.

या मच्छिमारांचा प्रवासखर्च एका पाकिस्तानी स्वयंसेवी संस्थेकडून कऱण्यात येत आहे. आणखी २६२ मच्छिमार पाकिस्तानच्या कैदेत असल्याचे मालिर कारागृह अधिक्षक हसन सेहतो यांनी सांगितले. पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील मच्छिमारांना अनधिकृतपणे दुसऱ्या देशाच्या हद्दीत मासेमारी केल्याच्या आरोपावरुन ताब्यात घेण्यात येते. याचे कारण म्हणजे अरबी समुद्रामध्ये दोन्ही देशांची नेमकी सीमा ठरलेली नसल्याने मच्छिमार एकमेकांच्या हद्दीत जातात. याचे आणखी एक कारण म्हणजे लाकडाच्या बोटी पाण्याच्या प्रवाहानुसार वाहत जातात आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळ लागत असल्याने मच्छिमार दुसऱ्या देशाच्या हद्दीत शिरतात. त्यानंतर त्यांना सुरक्षा यंत्रणांकडून ताब्यात घेतले जाते आणि अनेक महिन्यांनी त्यांची चौकशी करुन सोडून देण्यात येते. अनेक वर्षे असे सुरु असूनही दोन्ही देशांकडून या समस्येवर कोणताही तोडगा निघालेला नाही.