पाकिस्तानकडून गेल्या १२ दिवसांत १४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची बाब समोर आली आहे. पाकिस्तानच्या सैन्याने शुक्रवारी सीमेवरील दोन ठाण्यांवर हल्ला चढविला. त्यामध्ये एक ग्रामस्थ जखमी झाला तर आंतरराष्ट्रीय सीमेवरील काही घरांचे नुकसान झाले. या हल्ल्यास भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
आंतरराष्ट्रीय सीमेवरील दोन ठाणी आणि आरएसपुरा उपविभागांत पाकिस्तानच्या रेंजर्सनी बेछूट गोळीबार केला. गोळीबार सुरू होताच भारतीय जवानांनीही मोक्याच्या जागांवर दबा धरून त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने तोफगोळ्यांचा मारा केला त्यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. या हल्ल्यात हरनामसिंग हा गावकरी जखमी झाला. पाकिस्तानने गेल्या १२ दिवसांत १४ वेळा तर ऑगस्ट महिन्यांत १६ वेळा शस्त्रसंधीचे उल् लंघन केले.
यापूर्वी १७ ते २० ऑगस्ट या कालावधीत पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून उखळी तोफांचा मारा केला होता. त्यामध्ये अनेक ग्रामस्थ जखमी झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.