अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर दहशतीचं वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी तालिबान राजवटीचा खरा चेहरा देखील समोर आला आहे. काबुल विमानतळाजवळ दोन आत्मघाती स्फोट झाले. त्यात १०० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक जण देवाचा धावा करताना दिसत आहे. विमानतळावरील नागरिकांची प्रतिक्षा यादी वाढत असल्याचं दिसत आहे. तसेच खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव वाढल्याने सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. माणसांची दयनीय अवस्था असताना अफगाणिस्तानातील पाळीव प्राण्यांना कुणी वालीच उरला नसल्याचं दिसत आहे. अशातच ब्रिटनच्या माजी सैनिकाने अफगाणिस्तानातून जवळपास २०० कुत्र्या माजरांना देशाबाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. त्यात त्याला यश मिळताना दिसत आहे.

अफगाणिस्तानमध्ये कर्तव्य बजावलेल्या माजी मरीन सैनिक पेन फार्थिंग यांनी काबुल विमानतळावरून एका खासगी जेटने जवळपास दोनशे कुत्रे-माजरांना नेलं. हे जेट विमान युके सरकारने तिथे अडकलेल्या युकेच्या लोकांना सोडवण्यासाठी आणलं होतं. मात्र या विमानात बसून २०० पाळीव प्राणी येणार आहेत. यासाठी पेन फार्थिंग यंनी ब्रिटीश सरकारकडे अपील केली होती. पेन फार्थिंग यांनी प्राण्यांना अफगाणिस्तानात एका शेल्टरमध्ये ठेवले होतं. आता माजी सैनिक या प्राण्यांसोबत ब्रिटनला येणार आहे.

“प्राण्यांना यापूर्वीच अफगाणिस्तानातून बाहेर काढलं असतं. मात्र त्याच दिवशी काबुल विमानतळावर स्फोट झाले. त्यात जवळपास ११० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही रेस्क्यू ऑपरेशन पुढे ढकलण्यात आलं होतं.”, असं संरक्षण सचिव बेन वॅलंस यांनी सागितलं.